पुणे (भ्रमर वृत्तसेवा) :- पुणे पोलिसांनी एका भंगाराच्या दुकानातून 1 लाख 65 हजार रुपये किंमतीचे तब्बल 1105 काडतुसे जप्त केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौर्यापूर्वी पुणे पोलिसांनी ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 14 जूनला देहू दौर्यावर येत असल्याने पुणे पोलिसांनी पुणे शहरात ऑल आऊट ऑपरेशन राबविला होते. या ऑपरेशन दरम्यान गुरुवार पेठेतील एका भंगार व्यावसायिकाच्या दुकानावर धाड टाकली. या धाडीत पुणे पोलिसांना जिवंत काडतुसे तसेच काडतुसाचे लीड सापडले. या प्रकरणी भंगारमालक व्यवसायिक दिनेशकुमार कल्लू सिंग सरोज या आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

दिनेशकुमार कल्लूसिंग सरोज यांच्या दुकानातून 56 जिवंत काडतुसे, 79 खराब काडतुसे आणि 970 बुलेट लीड अशी एकूण 1105 काडतुसे गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या काडतूसाची किंमत 1 लाख 65 हजार 900 रुपये आहे. आरोपीनं एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतुसे आणली कुठून? काडतुसे आणली कशासाठी? काडतुसे जवळ का बाळगल्या? यापूर्वी त्याने इतर कोणाला काडतुसे किंवा अग्नी शस्त्रे दिली आहेत काय? याबाबत पुणे पोलीस दिनेशकुमार कल्लूसिंग सरोजकडे सखोल चौकशी करत आहेत.