नाशिक (प्रतिनिधी) :- गेली दोन वर्ष कोरोना सावटामुळे निर्बंधात असलेल्या रंगपंचमीचा उत्सव यंदा उत्साहात आणी निर्बंधाविना साजरा होत आहे.

रंगाच्या या सणासाठी बाजारही सजला असून धुळे, जळगाव, औरंगाबाद येथील रंगविक्रेते शहरात दाखल झाले आहेत. यंदा ग्राहकी चांगली होऊन पैसा मिळेल अशी आशा विक्रेत्यांना आहे. रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला रंगखरेदीसाठी नाशिककरांनीही मोठा उत्साह दाखवल्याचे चित्र आहे.

नाशिकमध्ये होळीनंतर 5व्या दिवशी म्हणजे रंगपंचमीला रंग खेळण्याची परंपरा आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगावसह मराठड्यातील औरंगाबादहून रंगविक्रेते खास शहरात दाखल झाले असून त्यांनी यंदाचा रंगोत्सव कॅश करण्यासाठी शहरात कालपासूनच मुक्काम ठोकला आहे. आमच्या जिल्ह्यातील रंगउत्सव आटोपला आता उरलेले रंग नाशिकमध्ये विक्री होतील या उद्देशाने सुमारे 250 रंगविक्रेत्यांनी शहरातील विविध भागात रस्त्यांवर तात्पुरती दुकाने थाटली आहे. विशेष म्हणजे त्यातील अनेकांनी रविवारची रात्र रविवार कारंजा आणि रामकुंडावर काढली आणि काल सकाळपासून शहराच्या मुख्य बाजारपेठेत रंगाची दुकाने थाटली.
परजिल्ह्यातून आलेल्या रंगविक्रेत्यांमध्ये औरंगाबादहून आलेल्या विक्रेत्यांचे प्रमाण मोठे म्हणजे 100 पेक्षा अधिक आहे. यासह धुळे, जळगाव येथूनही 50 हून अधिक विक्रेत्यांनी रविवार कारंजा, मेनरोड, नवीन नाशिक, एमजी रोड, जुने सीबीएस परिसर, शालिमार, नाशिक रोड, सातपूर, अंबड यासह शहरातील मुख्य बाजारपेठेवरील रस्त्यांवर दुकाने थाटली आहेत. यंदा दोन वर्षांनंतर साजर्या होणार्या रंगोत्सवासाठी चांगला धंदा होईल आणि जाताना गावी चांगली कमाई करुन जाऊ असा विश्वास रंगविक्रेत्यांनी बोलून दाखवला.
असे आहेत रंगाचे दर
वॉटर कलरचे पाऊच 10 रुपयांपासून विक्रीस आहेत. नैसर्गिक रंगाने रंगोत्सव साजरा करण्याची संकल्पना गेल्या काही वर्षांपासून जोर धरत आहेत. सिंथेटीक रंगाच्या तुलनेत नैसर्गिक रंग महाग असल्याने 100 टक्के नैसर्गिक रंग बाजारपेठेत व्रिकीला आले नाही. रसायनांचा कमी अंश असलेले रंग मोठ्या प्रमाणात खरेदी केले गेले. ओल्या आणि वॉरनिशी रंगापेक्षा कोरड्या रंगांना ग्राहकांची पसंती अधिक दिसून आली.
चांगल्या धंद्याची अपेक्षा
धुळ्याहून रंगविक्रीसाठी आलो आहे. संपूर्ण रात्र आर के चौकात काढली. काल ग्राहकी चांगली झाली. आज दिवसभर नाशिकमध्ये थांबून मग गावी परतणार आहे. वर्षभर रंग पडून राहण्यासाठी ग्राहकांना कमी जास्त दर करुन संपूर्ण रंग विकण्याचा इरादा आहे. त्यामुळे भाव थोडे पडून मागितले गेले तरी विक्री करणार. यंदा ग्राहकी चांगली आहे.
गणेश मोहरकर,
रंग विक्रेता.