ज्येष्ठ सर्पमित्र व समाजसेवक अण्णा लकडे यांचे दुःखद निधन

नाशिक :- ज्येष्ठ समाजसेवक व सर्पमित्र दामोदर रंगनाथ तथा लकडे यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. ते 93 वर्षांचे होते.

समाजसेवेमध्ये अण्णा यांचा सुरुवातीला लोकमान्य ब्रास बँड या त्या काळातील लोकप्रिय वाद्यवृंदाशी निकटचा संबंध होता. सराफ बाजारात ज्योती फोटो स्टुडिओ नावाचा त्यांचा फोटो स्टुडिओ होता. कलाप्रेमी फोटोग्राफर म्हणून त्यांची ख्याती होती. तसेच नाशिक जिल्ह्यात एस. परशराम यांच्या नंतर ते दुसरे वृत्तपत्र छायाचित्रकार होते. नाशिकच्या सांस्कृतिक कलाकारांचा ज्योती स्टुडिओ हा एक आधार बनला होता.

अण्णा लकडे हे सर्पमित्र म्हणूनही प्रसिद्ध होते. अनेक ठिकाणी मुख्यतः शासकीय निवास्थाने व कार्यालये येथे निघालेले सर्प पकडून त्यांना दूरवर सोडण्याचे काम ते विनामूल्य करीत. सर्प दंश झालेल्या अनेक रुग्णांना त्यांनी मंत्रोपचाराने जीवदान दिले. नागीण रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तींवर योग्य उपचार करून अनेकांना त्यांनी बरे केले. अण्णा हे उत्कृष्ट जलतरणपटू होते. 9 सप्टेंबर 1969 च्या महापुरात त्यांनी अनेक लोकांचे जीव वाचविले. शिवसेना स्थापन झाल्यानंतर प्रारंभीच्या पहिल्या फळीचे ते शिवसैनिक होते. महापुरातील त्यांच्या कामकाजानंतर रविवार कारंजा येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती. तेथे बाळासाहेबांनी अण्णांचा विशेष सत्कार केला होता.

एक कार्यक्षम नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केले. जुन्या काळातील वॉर्ड नंबर 4 मधून ते विजयी झाले होते. त्यांच्या काळात सफाई कर्मचाऱ्यांनी संप केला असतांना त्या काळात असलेले टोपली संडास त्यांनी स्वतः हाताने स्वच्छ केले. काही काळ ते उपनगराध्यक्षही होते. त्यांच्या समाज सेवेबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते.

अण्णा हे भ्रमर परिवाराचे ज्येष्ठ सदस्य होते. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी 3 वाजता श्रीराम अपार्टमेंट, काळाराम मंदिर दक्षिण दरवाजा येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघेल. लकडे परिवाराच्या दुःखात भ्रमर परिवार सहभागी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!