मुंबई : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. लक्ष्य सेन याने आपल्या वयाबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल झाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली असून शहरामध्ये बॅडमिंटन अकादमी चालवणारे नागराज एम.जी. यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, लक्ष्य सेन याचा जन्म 1998 मध्ये झाला होता. परंतु त्याने चुकीच्या पद्धतीने 2001 ही जन्मतारीख नमूद केली होती. खोटी कागदपत्रे तयार करून आरोपीने इतर खेळाडूंची फसवणूक करून शासनाकडून चुकीच्या पद्धतीने फायदा मिळविल्याचे देखील तक्रारीमध्ये म्हटले आहे.

बंगळुरूमधील हाय ग्राउंड्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्यचे वडील धीरेंद्र कुमार सेन, त्याची आई निर्मला सेन, भाऊ चिराग सेन आणि प्रशिक्षक विमल कुमार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. धीरेंद्र कुमार सेन हे बॅडमिंटन प्रशिक्षक आहेत, तर लक्ष्यचा भाऊ चिराग सेन हा देखील बॅडमिंटनपटू आहे.
लक्ष्य आणि त्याचा भाऊ चिराग या दोघांच्या जन्माच्या दाखल्यांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. कर्नाटक बॅडमिंटन असोसिएशन विमल कुमार आणि प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीच्या प्रशिक्षकांच्या संगनमताने दोघेदेखील कमी वयोगटातील प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये भाग घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
2010 पासून हे सर्व होत असल्याचे देखील तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. तक्रारदार नागराजू यांनी ही तक्रार दाखल केली असून आता तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी आयपीसी कलम 420, 468, 471 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.