नाशिक (प्रतिनिधी) :- शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश (बाळा) कोकणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याने या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की काल रात्री एम. जी. रोडवरून कोकणे हे आपल्या घरी जात होते. यशवंत व्यायामशाळेजवळ ते आले असता दोन दुचाकींवरून ट्रिपलसीट आलेल्या सहा जणांनी त्यांना रोखले. त्यांच्यापैकी एकाने कोकणे यांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने हल्ला चढविला, तर दुसर्याने लाकडी दांडक्याने त्यांच्या पायावर मारहाण करून ते तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली व सरकारवाडा येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत अ्रसलेल्या कोकणे यांना स्थानिक लोकांनी त्वरित जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फरार अज्ञात हल्लेखोरांचा पोलीस रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते. घटनास्थळाजवळ असलेल्या विविध सीसीटीव्हींचे फुटेज त्यांनी तपासले. हल्ला नेमका कोणी व का केला? हे अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने या हल्ल्यात कोकणे बचावले.
हल्लेखोरांचा पोलीस कसून शोध घेत असल्याचे भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी सांगितले. या प्रकरणी कोकणे यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते करीत आहेत.