मुंबई (भ्रमर वृत्तसेवा) :- शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसोबत बंड करणार्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. 48 तासांच्या आत या आमदारांना आपली भूमिका मांडण्यास सांगितले आहे. जर आमदारांनी आपली भूमिका मांडली नाही, तर त्यांना अपात्र ठरवण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली.
शिवसेनेकडून 16 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवावे, यासाठी विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात महाधिवक्त्यांची विधान भवनात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि इतर नेत्यांसोबत याबाबत बैठक झाली. साधारण चार तास चाललेल्या बैठकीनंतर बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. आपली भूमिका मांडण्यासाठी बंडखोर आमदारांना सोमवारपर्यंत वेळ देण्यात आला आहे.
तसेच बंडखोर आमदारांना परत पक्षात घ्यायचे की नाही हा निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत. या आमदारांचा वेगळा गट होऊ शकत नाही. त्यांना भाजपामध्ये विलीन व्हावे लागेल. मात्र, आम्ही कट्टर शिवसैनिक असल्याची डायलॉगबाजी हे बंडखोर आमदार करत होते. पण भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर ती डायलॉगबाजी बंद होईल, असा टोला सावंत यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी शिवसेना सोडून दूर लपून बसलेल्या त्या आमदारांसाठी स्वत:चे दरवाजे बंद केले आहेत. त्यामुळे आता त्यांना शिवसेनेचा भगवा सोडून कमळाबाईची साथ पकडावी लागेल, असा टोलाही अरविंद सावंत यांनी लगावला.