नाशिक (राजन जोशी) :– भाजपाकडून ईडीच्या माध्यमातून शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी केला आहे.

कितीही संकटे आले तरी शिवसेना मागे हटणार नाही शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या पाठीशी सर्वजण ठामपणे उभे असल्याचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.
शिवसेना नेते खा. संजय राऊत यांना ईडीने अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज शिवसेना कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी करून खा. राऊत यांच्या अटकेचा निषेध व्यक्त केला. महिला आघाडीच्या वतीने शोभा मगर यांच्या नेतृत्वात काही महिलांनी शिवसेना कार्यालयासमोर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख करंजकर यांनी सांगितले की ईडी सारख्या यंत्रणेच्या माध्यमातून शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. खा. राऊत यांनी उसने पैसे घेतल्याचे कारण पुढे करून त्यांना अटकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. यावेळी बडगुजर यांनी सांगितले की, खा. राऊत यांना चुकीच्या पद्धतीने ईडीच्या माध्यमातून गुंतवण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. या सर्व प्रकारामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुनील बागुल, दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, वसंत गिते, विलास शिंदे, शोभा मगर, माजी आमदार योगेश घोलप, शिवाजी भोर, डी.जी. सूर्यवंशी, सचिन मराठे, माजी नगरसेवक अॅड. शामला दीक्षित, शितल भामरे, किरण दराडे, संजय भामरे, नाना पाटील, सुभाष गायधनी, उमेश चव्हाण यांच्यासह शहरातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.