ठाणे (भ्रमर वृत्तसेवा) :- शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असणार्या ठाणे जिल्ह्यात आता राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.

कळवा तसेच ठाणे परिसरात शिंदे समर्थकांनी ‘आम्ही साहेबांसोबत’ असे बॅनर लावण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या बॅनर्सवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे फोटो गायब आहेत. बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे फोटो मात्र लावण्यात आलेत.
ठाणे शहरातील महापालिकेतील 90 टक्क्यांपेक्षा अधिक माजी नगरसेवक शिंदे यांच्या सोबत राहतील असे दावे त्यांचे समर्थक करू लागले आहेत.

टेंभी नाका येथील आनंद आश्रमात एरवी शिवसैनिकांची गर्दी असते. मात्र काल या ठिकाणी फारशी गर्दी नव्हती. बुधवारी मात्र ठाणे, कळवा भागात शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लागल्याने ही शिवसेना आणि ‘शिंदे सेना’ अशी थेट लढाई आता सुरू होईल असे संकेत मिळू लागले आहेत.