इंजेक्शन घेतांना, दाढी करतांना, टॅटू काढतांना एका गोष्टीची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. ती म्हणजे सुई किंवा ब्लेड बदलले आहे का, हे प्रत्येकाने तपासून घ्यायला हवे. निष्काळजीपणा केल्यास ते आपल्याच अंगलट येऊ शकते. असाच एक प्रकार उत्तरप्रदेशमध्ये घडला.
सध्याच्या तरुण, तरुणी यांना आपल्या अंगावर टॅटू काढणे मग ते तात्पुरते असो किंवा कायमस्वरूपी ते काढण्यात खूप उत्साही असतात. मात्र, या उत्साहात दुकानदाराने सर्व काळजी घेतली आहे का? हे तपासणे ही तरुणाई विसरून जाते.
टॅटू गोंदवून घेणे उत्तर प्रदेशातल्या 14 जणांना चांगलेच महागात पडले आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये 14 जणांना टॅटूसाठी वापरण्यात आलेल्या सुईने मृत्यूच्या दाढेत ढकलले.
त्या 14 जाणांना टॅटू गोंदवल्यानंतर अचानक ताप आला. त्यानंतर त्यांची टायफॉइड आणि मलेरियाचीही तपासणी करण्यात आली. पण त्यामध्ये काही निष्पन्न झाले नाही. त्या 14 जणांचा ताप कमी होत नव्हता. त्यामुळे त्यांची एचआयव्हीची तपासणी करण्यात आली. या चाचणीमधून त्यांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे निदान झाले.
या 14 जणांची विचारपूस करण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांनी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवला नव्हता. या 14 जणांनी ज्या टॅटू आर्टिस्टकडून टॅटू गोंदवला त्या आर्टिस्टणे पैसे वाचविण्यासाठी एकाच सुईचा वापर केला होता. त्यामुळेच त्यांना हा संसर्ग झाला.