मुंबई : ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लहिरी (वय 69) यांचे आज सकाळी निधन झाले आहे. मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

बप्पी यांच्या गळ्यात सोन्याच्या मोठमोठ्या माळा, बोटांमध्ये अंगठी असे सोन्याचे दागदागिने, लांब केस, डोळ्यांवर चष्मा, सोन्याचे दागदागिने आणि रंगबेरंगी कपडे असा त्यांचा पेहराव कायम लक्षवेधी असायचा.

बप्पी लहरी यांचे खरे नाव अलोकेश लहरी होते. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी जलपैगुडी पश्चिम बंगालमध्ये झाला होता. त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतील गाण्यांमध्ये पॉपचा तडका आणला. बप्पी यांच्या गाण्यांनी, संगीताने भारतीय संगीत विश्वाला एक वेगळी ओळख दिली आहे. 1973 मध्ये ‘नन्हा शिकारी’ सिनेमात गाणे गाण्याची संधी त्यांना मिळाली होती. मात्र त्यानंतर 1975 मध्ये ‘जख्मी’ या सिनेमातून त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली. या सिनेमातून त्यांनी मोहम्मद रफी आणि किशोर कुमार सारख्या महान गायकांसोबत गाणे गायले होते. बप्पी लहरी आणि मिथुन चक्रवर्ती यांची जोडी चर्चेत राहिली. एकीकडे मिथुन यांचा डान्स तर बप्पी लहरी यांची पॉप, डिस्को गाणी असे कॉम्बिनेशन प्रेक्षकांच्या चांगलंच मनात उतरले होते.
https://twitter.com/ANI/status/1493778716006416385?t=oRSDqL1HEELrqaPXV4TocQ&s=19
80 आणि 90 च्या दशकातला काळ त्यांनी त्यांच्या गाण्यांनी चांगलाच गाजवला होता. हिंदीसह त्यांनी बंगाली, गुजराती, तामिळ, तेलुगू, कन्नड गाणी देखील गायली आहेत. आत्तापर्यंत त्यांनी गायन आणि संगीत क्षेत्रातील काम सुरु ठेवले होते. 2020 मध्ये ‘बागी 3’ सिनेमातील भंकस हे गाणे त्यांचे हिंदी सिनेसृष्टीतील शेवटचं गाणे ठरले. 63 व्या फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात त्यांना संगीत क्षेत्रातील कामगिरीसाठी जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते.