पुणे : दौंड तालुक्यामधील पारगाव हद्दीत असणाऱ्या भीमा नदीपात्रामध्ये गेल्या पाच दिवसांमध्ये ४ मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नदीपात्रामध्ये १८ जानेवारी ते २२ जानेवारी या दरम्यान हे मृतदेह सापडले आहेत. हे सर्व मृतदेह ३८ ते ४५ या वयोगटामधील असल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मृतदेहांमध्ये दोन पुरुष आणि दोन स्त्रियांचा समावेश आहे. या घटनेने जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. हे सर्व मृतदेह एकाच कुटुंबातील असण्याची शक्यता वर्तवली जात आसून अजून मृत व्यक्तींच्या मुलांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एनडीआरएफ टीमकडून शोधकार्य सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्याच्या पारगाव हद्दीमध्ये भीमा नदीपात्रात स्थानिक मच्छिमार बुधवारी (दि. १८) मासेमारी करत होते. त्यावेळी त्यांना एका स्त्रीचा मृतदेह आढळून आला होता. तसेच शुक्रवारी (दि. २०) पुरुषाचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर २१ तारखेला पुन्हा एका स्त्रीचा मृतदेह आढळला होता. तसेच २२ तारखेला पुन्हा पुरुषाचा मृतदेह आढळला. असे पाच दिवसांमध्ये एकूण ४ मृतदेह आढळले. सलग चार मृतदेह सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. पोलीस प्रशासन देखील या घटनेने चक्रावले आहे. त्यामुळे ही सामूहिक आत्महत्या आहे की मोठा घातपात, याबाबतचा तपास करण्याचे आव्हान पोलीस प्रशासनापुढे निर्माण झाले आहे.

नदीपात्रामध्ये आढळलेल्या मृतदेहांमध्ये पती-पत्नी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी यानंतर भीमा नदीपात्रामध्ये कसून शोधकार्य सुरू केले आहे. तसेच परिसरामध्ये देखील या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मृत व्यक्तींसोबत त्यांची मुले असण्याचीही शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. यामधील एका मृतदेहासोबत एक चावी तर महिलेच्या मृतदेहासोबत मोबाईल फोन व सोने खरेदीची पावती सापडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, चारपैकी ३ मृतदेहांचे शवविच्छेदन झाले असून त्यामधील रिपोर्टमुळे तपासाला दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला सूचना केल्या आहेत.