नाशिक (प्रतिनिधी) : शहर परिसरातून काल पाच जण घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याची नोंद वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे.
बेपत्ताचा पहिला प्रकार अंबड परिसरात घडला. खबर देणार राजेंद्र प्रकाश पवार (रा. पाटीलनगर, शिवानंद चौक, नाशिक) यांच्या साडूची मुलगी एकता प्रमोद ढगे (वय २३) ही कॉलेज रोड येथे सीएच्या ऑफिसमध्ये कामाला जाते, असे सांगून सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गेली. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास फिर्यादी पवार यांना प्रमोद ढगे यांचा फोन आला. या मुलीने कोणाबरोबर तरी लग्न केले असून, ती घरी येणार नसल्याचे फोनवर सांगितले. त्यानंतर तिचा सर्वत्र शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे.

बेपत्ताचा दुसरा प्रकार वंजारवाडी येथे घडला. खबर देणार सुरेखा भगवान जाधव (रा. वंजारवाडी, ता. जि. नाशिक) यांचे पती भगवान पोपट जाधव (वय ४०) हे दि. २० जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घरात काहीही न सांगता निघून गेले आहेत. ते अद्याप घरी परतले नाहीत. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे.
बेपत्ताचा तिसरा प्रकार नांदूर गाव येथे घडला. खबर देणार सुमन बाळू ढगे (रा. जनार्दननगर, नांदूर गाव) यांची मुलगी कोमल ढगे (वय २०) ही दि. २० जानेवारी रोजी सकाळी कॉलेजला गेली होती; मात्र ती उशिरापर्यंत घरी आली नाही. त्यावेळी तिच्या मैत्रिणीची विचारपूस केली असता कोमल ही दुपारी दोन वाजेपर्यंत कॉलेजला असल्याचे सांगितले. त्यानंतर मात्र ती कुठे गेली, ते माहीत नाही. या प्रकरणी बेपत्ताची नोंद उपनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
बेपत्ताचा चौथा प्रकार जेलरोड येथे घडला. खबर देणार भीमराव काशीनाथ गायकवाड (रा. साईदर्शन अपार्टमेंट, कॅनॉल रोड, जेलरोड) यांची मुलगी पूजा गायकवाड (वय २५) ही दि. २२ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गार्डनला जाऊन येते, असे सांगून घरातून निघून गेली. ती अद्याप घरी परतली नाही. म्हणून बेपत्ताची नोंद नाशिकरोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
बेपत्ताचा पाचवा प्रकार गोळे कॉलनीत घडला. खबर देणार संदीप धर्मा खैरनार (रा. वाल्मीकनगर, पंचवटी) यांचा मुलगा देवराम खैरनार (वय २४) हा व त्याची मैत्रीण हे गोळे कॉलनीत होते. त्यावेळी संदीप खैरनार हे त्या दोघांना समजावून सांगत होते. त्यादरम्यान या दोघांनी आपले मोबाईल खबर देणार संदीप खैरनार यांच्याकडे दिले. त्यानंतर खैरनार यांना कळायच्या आत हे दोघे तेथून पसार झाले. त्यांचा सर्वत्र शोध घेतला; मात्र ते मिळून आले नाहीत. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे.