नाशिकमध्ये तीन अपघातांत “इतके” जण ठार

नाशिक (प्रतिनिधी) : शहरात बुधवरी (दि. 7) वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातांमध्ये दोन जण ठार, तर दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अपघाताचा पहिला प्रकार विहितगावजवळ घडला. फिर्यादी अतुलकुमार विजयबहादूर दुबे (रा. शक्‍तीनगर, हिरावाडी, पंचवटी) यांचा पुतण्या श्रीकृष्ण आशुतोष दुबे (वय 16, रा. जय भवानी रोड, नाशिकरोड) हा एमएच 15 एफजे 9251 या क्रमांकाच्या मोटारसायकलीने राहत्या ठिकाणाहून विहितगाव ते वडनेर दुमाला बाजूकडे जात होता. त्यावेळी भरधाव आलेल्या एमएच 15 डीके 7564 या क्रमांकाच्या महिंद्रा पिकअप बोलेरोवरील चालकाने दुबे याच्या मोटारसायकलीला धडक दिली. त्यात तो रस्त्यावर पडल्याने त्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बोलेरोचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोळे करीत आहेत.

अपघाताचा दुसरा प्रकार मुंबई- आग्रा सर्व्हिस रोडवर घडला. फिर्यादी महादू काशीनाथ खैरनार (वय 67, रा. मु. पो. वासूळ, ता. देवळा, जि. नाशिक) हे जत्रा हॉटेल ते आडगाव या सर्व्हिस रोडने पायी जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच 15 जीवाय 8017 या क्रमांकाच्या सिटीलिंकवरील बसचालकाने त्यांना धडक दिली. त्यात खैरनार हे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार डापसे करीत आहेत.
अपघाताचा तिसरा प्रकार शालिमार परिसरात घडला. फिर्यादी विद्या प्रशांत जाधव (रा. खडकाळी, नाशिक) यांची लहान मुलगी खुशी जाधव (वय 8) ही रस्त्याने पायी जात होती.

त्यावेळी खडकाळी सिग्नलकडून शालिमारकडे जाणार्‍या एमएच 15 जीव्ही 7705 या क्रमांकाच्या सिटीलिंक बसवरील चालकाने या मुलीला ठोस मारली. या अपघातात मुलीच्या डाव्या पायाला जखम झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सिटीलिंक बसचालकाविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक ढमाले करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!