भिवंडीत धोकादायक इमारतीची भिंत कोसळून ‘इतके’ जण गंभीर जखमी

भिवंडी : शहरातील चव्हाण कॉलनी परिसरात एका मंगल कार्यालयाची धोकादायक संरक्षक भिंत शेजाऱ्याच्या घरावर कोसळल्याने ६ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये रस्त्यावर खेळत असलेल्या ३ चिमुरड्या मुलांसह २ वृद्ध, १ युवती असे ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जेसीबीच्या साहाय्याने पाडकाम सुरू असतांनाच मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.

शहरातील चव्हाण कॉलनी परिसरात गरीब नवाज हॉल हे खुल्या मैदानातील मंगल कार्यालय आहे. या मंगल कार्यालयाची संरक्षक भिंत धोकादायक झाल्याने मनपा प्रशासनाने खासगी कंत्राटदाराकडून धोकादायक भिंत पाडण्याचे काम मंगळवारी सायंकाळी सुरु केले होते. यावेळी भिंत पलीकडे असलेल्या रहिवासी गल्लीतील रस्त्यावर कोसळली. या रस्त्यावर लहान मुले खेळत होती, तर तिघेजण या रस्त्यावरून जात असतांना भिंत अंगावर कोसळल्याने हे ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.

अलीशा (वय ३), जैनाब अजहर खान (वय ४), फैजान (वय ८), नाझिया शेख (वय १७) , निजामुद्दीन अन्सारी (वय ६०) वर्ष आणि एक सत्तर वर्षाची वृद्ध महिला असे या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या सहा जणांची नावे असून यांना सुरुवातीला शहरातील स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र गंभीर दुखापत असल्याने त्यांना ठाणे कळवा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. सध्या या सहाही जणांवर भिवंडीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या बेकायदेशीर कारभाराचा निषेध करत जेसीबीची तोडफोड केली. मनपा प्रशासनाने ही कारवाई करतांना परिसरातील नागरिकांना कोणतीही सूचना दिली असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे. तर या जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च मनपा प्रशासनाने उचलून या जखमींना आर्थिक साहाय्य करून बेजबाबदारपणे तोडक कारवाई करणाऱ्या मनपा अधिकारी कर्मचारी व कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर निलंबना करावी, अशी मागणी माजी नगरसेवक अरुण राऊत यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!