नाशिकच्या सोज्वल साळीने पुण्यात शोधले असंख्य प्राचीन खेळ

 

पुणे (भ्रमर वृत्तसेवा) :- ऐतिहासिक, पौराणिक काळात राजे, महाराजे, व्यापार्‍यांसह सामान्य नागरिक खेळत असलेले खेळ आजही अस्तित्वात आहेत. या खेळांचा नियमित वापर होत असल्याचा शोध नाशिकचा प्राचीन लिपी अभ्यासक सोज्वल साळी याने लावला आहे. हिंजवडी येथील मरुंजी डोंगरावर सोज्वळ साळी व ऋषी राणे यांनी तब्बल 41 खेळांचे पट मरुंजी डोंगरावर शोधून त्याचे डॉक्युमेंटेशन केले. हे खेळ वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्ट, नाशिक यांच्यामार्फत शोध मोहीम चालू असल्याचे त्यांनी सांगितले. जमिनीवर हे खेळ कोरल्याचे अवशेष अजूनही शिल्लक असल्याचे बघायला मिळते.

कोणतेही खेळ हे केवळ शारीरिक संवर्धनासाठीच खेळले जात नाहीत, तर मनाच्या पोषणासाठी, करमणूक, व्यापार, व्यवहारातील बोलणी करण्यासाठी व युद्धातील तहामध्येही खेळत असल्याचे आपल्याला माहीत आहे. ज्याप्रमाणे महाभारतात जे द्यूत युद्ध खेळले गेले, त्या पच्चिसी खेळाचा पट नाशिकच्या पांडवलेणी अर्थात त्रिरश्मी लेण्यांमधील गुहांमध्ये कोरल्याचा शोध सोज्वल साळीने लावला आहे. यातील अनेक खेळ आजही महाराष्ट्राच्या घराघरात, दक्षिण भारत तसेच विदेशात खेळले जात असल्याचे त्याने सांगितले. पौराणिक आणि बौद्ध ग्रथांमध्येही या पटखेळांचा उल्लेख आढळतो.

पुण्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हे खेळ आढळल्यानंतर राज्यासह देशभरातील विविध लेण्यांमध्येही असे खेळ आढळण्याची शक्यता त्याने वर्तविली आहे. असे पटखेळ सापडण्याचे कारण म्हणजे पूर्वीच्या काळी इतिहास संशोधन करणारे पर्यटक, भिक्षू, संशोधक, प्रवासी, व्यापारी मुक्कामांसाठी अशा डोंगरांवर, मंदिरांमध्ये महिने, दोन महिने थांबत. त्यामुळे या काळात काय करावे तर पटखेळ खेळावे असा विचार त्या प्रवाशांच्या मनात आला असावा. त्यांनी या डोंगरावर त्या काळी, त्यांच्या देशात प्रचलित असलेले खेळ जमिनीवर कोरल्याचा अंदाज सोज्वल साळी व ऋषी राणे यांनी व्यक्त केला आहे.

पटखेळाची माहिती
मंकाला हा खेळही प्राचीन आहे. बुद्धीचा वापर करून हा खेळला जातो. यात नशिबाचा कोणताही घटक उपयोगी येत नाही. हजारो वर्षांपासून हा खेळला जातो. इथियोपिया, सुदान, घाना, दक्षिण आफ्रिका व भारतात खेळला जातो. हा खेळ 48 छिद्रांच्या बोर्डवर 12 बियांच्या सहाय्याने खेळला जातो. जो स्पर्धक जास्त बिया गोळा करू शकतो, तो विजयी ठरतो. अत्यंत रंजक असा हा खेळ आहे.

वाघबकरी हा खेळ प्रामुख्याने नेपाळ, दक्षिण भारतामध्ये बघायला मिळतो. या खेळामध्ये तीन वाघ आणि 15 बकर्‍या असतात. वाघाने बकरीला खायचे तर बकर्‍यांनी मिळून वाघाला अडवायचे अशी या खेळाची संकल्पना आहे. पौराणिक काळात मंदिरांमध्ये जमिनीवर हा खेळ कोरलेला आढळतो. या खेळाचा पट नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पुष्पा चित्रपटात सुद्धा गाण्यामध्ये वाघ बकरे असा उल्लेख आढळतो, तसेच त्या खेळाचा पटसुद्धा गाण्यामध्ये दिसतो.

राज्यात शोध वाढवायला हवा 
प्राचीन खेळ संवर्धन मोहीम (बैठे खेळ) या नावाने फेसबुकवरील समूहात संपूर्ण महाराष्ट्रात असलेले खेळ, घराघरात खेळले जाणारे खेळ व त्यांची वेगवेगळी नावे अशा प्रकारे या युवकांचे मॅपिंगद्वारे काम 11 जानेवारी 2022 पासून सुरू झाले असून, आतापर्यंत 300 पेक्षा जास्त खेळांचे डॉक्युमेंटेशन करून झाले आहेत.

आपल्याला या मोहिमेत सहभागी व्हायचे असल्यास अथवा आपल्या गावातील, परिसरातील असे कोरलेले खेळ आपल्या नावाने नोंदवायचे असल्यास सोज्वळ साळी (मो. 8208565176) यांच्याशी संपर्क साधावा.

भारतातील सर्वांत मोठ्या आकाराचा वाघ बकरी पट मारुंजी या डोंगरावर आतापर्यंत मिळालेल्या वाघाबकरी/बाघचालचा पट साधारणपणे 1 ते 2 फूट या आकाराच्या लांबी व रुंदीचे मिळतात; परंतु मारुंजी येथे तब्बल 6 फूट लांबी व रुंदी असलेला पट मिळाला असल्याने हा भारतातील सर्वांत मोठ्या आकाराचा कोरीव पट आहे, असे सोज्वल साळी यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!