मुंबई (भ्रमर वृत्तसेवा) :-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात शिवसेनेचे महाराष्ट्रातील 12 खासदार गेल्यानंतर आणखी काही खासदार जात आहेत. इतके दिवस मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे गटांदरम्यान मनोमिलन व्हावे, यादृष्टीने प्रयत्न करणारे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे देखील शिंदे गटात सामिल झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान शिंदे गटात सामिल होणार्या सर्व खासदारांच्या निवासस्थान व कार्यालयांवर केंद्र शासनामार्फत वाय दर्जाची सुरक्षा देण्यात येत आहे. त्या अंतर्गत खा. गोडसे यांच्या देवळाली येथील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे.तर शालिमार परिसरातील कार्यालयाला देखील बंदोबस्त देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत काल झालेल्या बैठकीस उपस्थित राहणार्या नाशिकमधील शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाजवळ सकाळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तीन दिवसांपासून खासदार गोडसे हे दिल्लीला गेल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीत त्यांनी सद्य परिस्थितीत शिवसेनेने भाजपासोबत जावे अशी भूमिका घेतली होती त्यानंतर त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली होती.
शिवसेनेत मोठी फूट पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आता शिवसेनेचा खासदार शिंदे गटात जात आहेत. जवळपास 12 खासदार शिंदे गटात दाखल होत आहेत.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून या खासदारांना ध दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. आज दुपारनंतर शिंदे आणि समर्थक खासदारांची पत्रकार परिषद होत आहे. खासदार कृपाल तुमाने यांच्या घराची सुरक्षा वाढवली गेली आहे. शिंदे गटात जाणार्या संभाव्य खासदारांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. खासदारांचं कार्यालय, घराला पोलिसांची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. शिवसेनेचे कृपाल तुमाने नागपूरच्या रामटेकचे खासदार आहेत.