Home खेळ भारतीय क्रिकेटपटू होणार मालामाल; आता एका खेळाडूला मिळणार ‘इतके’ रुपये

भारतीय क्रिकेटपटू होणार मालामाल; आता एका खेळाडूला मिळणार ‘इतके’ रुपये

0

मुंबई | भ्रमर वृत्तसेवा :  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्थानिक क्रिकेटपटूंसाठी एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे. स्थानिक क्रिकेटपटूंची मॅच फी अर्थात सामन्यानंतर मिळणारी रक्कम वाढवण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. बोर्डाचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी एक ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

बीसीसीआयच्या नव्या वेतनपद्धतीनुसार 40 पेक्षा जास्त मॅच खेळलेल्या खेळाडूंना 60 हजार रूपये, 23 वर्षांखालील क्रिकेटपटूंना 25 हजार तर 19 वर्षांच्या खालील क्रिकेटपटूंना 20 हजार रुपये मॅच फिस देण्यात येणार असल्याची घोषणा जय शहा यांनी केली आहे. त्याचबरोबर जे क्रिकेटपटू 2019-20 साली झालेल्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांना 2020-21 चा सिझन रद्द झाल्याने नुकसान भरपाई म्हणून 50 टक्के मॅच फिस देण्यात येणार असल्याचे जय शहा यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान खेळाडूंना किमान 50 टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी असे  बीसीसीआयच्या बहुतेक सदस्यांचे मत आहे. याबाबतचा अंतिम निर्णय बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शहा (Jay Shah) घेणार होते. बीसीसीआयच्या आज झालेल्या बैठकीत अखेर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तसेच बीसीसीआने दिलेल्या माहितीनुसार 2021-22 सीजनमध्ये सर्व वयांतील खेळाडूंचे मिळून 2 हजार 127 सामने खेळवले जाणार आहेत. ज्यात सर्वांत अधिक काळ रणजी ट्रॉफीची स्पर्धा चालणार आहे. तीन महिने चालणारी ही स्पर्धा झाल्यानंतर एक महिनाभर विजय हजारे ट्रॉफीची स्पर्धा होणार आहे.