IPL Auction 2022 : लिलाव पाहताना लागली झोप; अन् जाग आली तेव्हा ‘तो’ झाला करोडपती

मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : आयपीएल 2022 चा लिलाव (IPL Auction 2022) शनिवार आणि रविवारी बँगलोरमध्ये पार पडला. या लिलावात काही खेळाडू झटक्यात करोडपती बनले. यातलाच एक खेळाडू म्हणजे उत्तर प्रदेशचा डावखुरागोलंदाज यश दयाल (Yash Dayal). या लिलावामध्ये जेव्हा यशचे नाव घेण्यात आले तेव्हा फारच कमी जणांना त्याच्याबद्दल माहिती होती, पण आयपीएल टीमना या खेळाडूची क्षमता माहिती होती. याचमुळे 20 लाख रुपयांची बेस प्राईज असलेल्या या खेळाडूला गुजरात टायटन्सनी (Gujarat Titans) 16 पट जास्त रक्कम देऊन 3.20 कोटी रुपयांना विकत घेतले. यशला आयपीएल लिलावात आपल्यावर एवढी बोली लागेल, हे माहिती नव्हते. यश सध्या रणजी ट्रॉफीसाठी गुरूग्राममध्ये आहे. उत्तर प्रदेशच्या आपल्या टीमसोबत तो हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहे.

यश दयाल आपल्या हॉटेलच्या खोलीत आयपीएलचा लिलाव पाहत होता. पण त्याचे नाव येत नव्हते, म्हणून तो टीव्ही बंद करून आणि मोबाईल फोनही सायलेंट करून झोपला. पण तासाभरानंतर जेव्हा त्याला जाग आली, तेव्हा त्याच्या फोनवर मित्र आणि कुटुंबीयांचे मिस्ड कॉल्स आणि मेसेज आले होते. वडील चंद्रपाल दयाल यांचे २० मिस्ड कॉल यशच्या फोनवर होते. त्याने आधी त्याच्या वडिलांना फोन केला, नंतर कळले की त्याची आयपीएलमध्ये निवड झाली आहे आणि गुजरात टायटन्स संघाने त्याला मूळ किमतीच्या १६ पट देऊन ३.२ कोटी रुपयांना खरेदी केले.

याबाबत बोलतांना यशचे वडील चंद्रपाल यांनी सांगितले की, “यश फोन का उचलत नाही याची आम्हाला काळजी वाटत होती. जेव्हा मी त्याला लिलावाबद्दल सांगितले तेव्हा त्याला वाटले की मी त्याला मूर्ख बनवत आहे. संघाचा एकही खेळाडू त्याच्या खोलीत गेला नाही. कारण कोरोना प्रोटोकॉलमुळे खेळाडूंना टीम हॉटेलमध्ये फिरण्याची परवानगी नव्हती.

कोण आहे यश दयाल?

यशने मागच्या वर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली होती. 7 मॅचमध्ये त्याने 3.77 च्या इकोनॉमी रेटने 14 विकेट घेतल्या होत्या. सातत्याने 140 किमी प्रती तास वेगाने बॉलिंग करणारा यश इन स्विंग आणि आऊट स्विंगही करू शकतो. यशचे वडील चंद्रपालही क्रिकेट खेळायचे, 80 च्या दशकात त्यांनी विजी ट्रॉफी खेळली, पण वडील आणि कुटुंबाने पाठिंबा दिला नाही. चंद्रपाल यांनी मात्र आपल्या मुलाला देशाकडून खेळता यावे, यासाठी पूर्ण पाठिंबा दिला. क्रिकेटमध्ये भविष्य नाही, वेळ वाया घालवू नकोस, त्यापेक्षा परिक्षेची तयारी करं, असं माझे वडील नेहमी सांगायचे, अशी प्रतिक्रिया चंद्रपाल यांनी दिली.

दरम्यान यशने 2018 साली उत्तर प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने 12 मॅचमध्ये 45 विकेट घेतल्या आहेत, तर 15 टी-20 मध्ये त्याला 15 विकेट घेण्यात यश आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!