मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI Series) यांच्यातील एकदिवसीय मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. एकदिवसीय मालिकेपूर्वी तीन भारतीय खेळाडू आणि एका स्टँडबाय खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. एकदिवसीय मालिकेसाठी प्रथमच कर्णधार बनलेल्या रोहित शर्माने (Captain Rohit Sharma) पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्याने काही महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले.

यावेळी तो म्हणाला की, उद्या होणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात इशान किशन भारतासाठी डावाची सुरुवात करेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार आणि फलंदाज म्हणून संघात परतला आहे. परंतु मालिकेच्या काही दिवस आधी भारतीय संघाला कोविडचा फटका बसला असून ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि नेट बॉलर नवदीप सैनी यांना वन डे मालिकेला मुकावे लागणार आहे. तसेच, बहिणीच्या लग्नामुळे केएल राहुलही पहिल्या वन डे साठी उपलब्ध नाही. त्यामुळे भारतीय संघात इशान किशनला दाखल करून घेण्यात आले असून तोच उद्याच्या सामन्यात ओपनिंग करणार आहे, असे रोहितने स्पष्ट केले आहे.

दरम्यान रोहितच्या नेतृत्वाखाली भारत आपला 1000 वा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळणार असून 1000 एकदिवसीय सामने खेळणारा भारत हा जगातील पहिला एकमेव संघ असणार आहे. तर डावखुऱ्या इशान किशनला वेस्ट इंडिजविरूद्धच्या टी२० मालिकेत संघात घेण्यात आले नव्हते. परंतु आता त्यांचा संघात समावेश झाला असून भारताचे काही खेळाडू कोरोनाबाधित असल्याने वन डे मध्ये सलामीवीर म्हणून किशनला अंतिम संघात स्थान मिळण्याची शक्यता अधिक आहे.