क्रीडा मंत्र्यांनी ब्रिजभूषण सिंहांविरुध्द केली “ही” मोठी कारवाई

नवी दिल्ली : दिग्गज कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचा निषेध करत आहेत. साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांच्यासह अनेक कुस्तीपटू या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.

जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट हिने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. दरम्यान, आंदोलक कुस्तीपटूंची केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीनंतर क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी मोठी कारवाई केली आहे. त्यांनी ब्रिजभूषण सिंह यांना २४ तासांत महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे. तसे न केल्यास त्यांना काढून टाकण्यात येईल, असे देखील सांगण्यात आले आहे.

दरम्यान, कुस्तीपटू साक्षी मलिक, बबिता फोगट, विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि इतर अनेक कुस्तीपटू देखील क्रीडामंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. अनुराग ठाकूर काल (दि. १९) चंदीगडहून दिल्लीला पोहोचले. यानंतर त्यांनी त्यांच्या निवासस्थानी पैलवानांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ठाकूर म्हणाले की, कुस्तीपटूंनी केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. भारत सरकारने WFI ला नोटीस पाठवून ७२ तासांच्या आत उत्तर मागितले आहे.

विनेश फोगटने ब्रिजभूषण सिंग यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आपल्या पदाचा गैरवापर करुन ते खेळाडूंचा मानसिक आणि शारीरिक छळ करत आहेत, असे फोगटने म्हटले आहे. भारतीय कुस्ती महासंघाविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंची काल सरकारशी चर्चा झाली. यानंतर साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी सांगितले की, आम्हाला समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही, फक्त आश्वासने मिळाली आहेत.

महासंघाच्या प्रमुखांना पदावरुन हटवून तुरुंगात पाठवले जात नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही. आमच्याकडे ५-६ मुली पुराव्यासह आहेत. सरकारने कारवाई केली नाही तर आम्ही पोलिसांकडे जाऊ, असा इशारादेखील कुस्तीपटूंनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!