Home खेळ पराभवानंतर भारताला मोठा धक्का; ‘हा’ खेळाडू पोहोचला रूग्णालयात

पराभवानंतर भारताला मोठा धक्का; ‘हा’ खेळाडू पोहोचला रूग्णालयात

0

नवी दिल्ली । भ्रमर वृत्तसेवा : टी-२० वर्ल्डकपमध्ये जेतेपदाचे दावेदार समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात मोठा झटका बसला आहे. रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या (३/३१) भेदक माऱ्यानंतर मोहम्मद रिझवान (नाबाद ७९) आणि कर्णधार बाबर आझमने (नाबाद ६८) केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे पाकिस्तानने दोन गुणांची कमाई केली.

या सामन्यानंतर भारताची चिंता वाढवली असून हार्दिक पांड्याच्या रूपाने भारताला मोठा धक्का बसू शकतो. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर पांड्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरला नाही आणि इशान किशन पांड्याच्या जागी उतरला. पांड्याची दुखापत किती आहे हे अजून निश्चित होऊ शकलेले नाही. पण येणारा धोका लक्षात घेता त्याला खबरदारी म्हणून स्कॅनसाठी पाठवण्यात आले आहे.

दरम्यान हार्दिक पांड्याला फलंदाजी करताना उजव्या खांद्याला दुखापत झाल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. तो स्कॅनसाठी गेला आहे. पांड्याने पाकिस्तानविरुद्ध 11 धावांची खेळी खेळली. भारताला आता पुढील सामना 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. अशा स्थितीत पांड्याच्या दुखापतीमुळे भारता समोर नवा पेचप्रसंग उभा राहिला आहे. तर बराच काळ गोलंदाजी करू शकला नसल्याने पांड्याच्या फिटनेसबद्दल टीम इंडिया आधीच चिंतेत होती.