“या” कारणावरून विद्यार्थ्यांना शाळेत ठेवले डांबून; संतप्त पालक आणि मनसे पदाधिकाऱ्यांकडून शाळेविरोधात तक्रार दाखल

पुणे : शाळेची फी न भरल्याच्या कारणावरुन विद्यार्थ्यांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. वाघोलीतील लेक्सिकॉन शाळेत ही घटना घडली. वाघोली येथील लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलची फी भरली नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर डांबून ठेवल्याप्रकरणी पालकांनी आणि मनसे पदाधिकारी यांनी शाळेविरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधितांवर खंडणी आणि अपहरणाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारीमध्ये करण्यात आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी मात्र आरोप फेटाळत पालकांचा गैरसमज झाल्याचे सांगितले आहे.

अधिक माहितीनुसार, वाघोलीमधील लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलमध्ये बुधवारी (दि. १८) दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांची घरी जाण्यासाठी सुट्टी झाल्यानंतर काही मुलांना शाळेतच ठेवून पालकांना फी भरण्यासंदर्भात सांगण्यात आले होते. फी भरा आणि मुलांना घेऊन जा असे शाळेकडून सांगण्यात आल्याचे काही पालकांनी सांगितले आहे. फी न भरलेल्या विद्यार्थ्यांचे पालक धावत पळत शाळेत आले आणि शाळेने केलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली.

त्याचवेळी मनसे पदाधिकारी आणि पालक एकत्रित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कार्यालयामध्ये हजर झाले. त्यांना या प्रकाराचा तीव्र शब्दात जाब विचारला. पालकांचा रोष पाहता लोणीकंद पोलिसांना देखील यावेळी बोलाविण्यात आले होते. काही पालक मुलांना घेण्यासाठी वर्गावर गेले असता त्यांना मुलांना भेटू दिले जात नसल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांच्या मध्यस्थीने वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला गेला. यानंतर मुलांना पालकांच्या हवाली करण्यात आले असले तरी संतप्त पालक आणि मनसे पदाधिकारी यांनी शाळेच्या विरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये फी भरली नसल्याने मुलांना डांबून ठेवल्याची तक्रार दाखल करुन खंडणी, अपहरणाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!