नाशिक (राजन जोशी) : – आपल्याला जीवनात काय करायचे आहे याचा पूर्णपणे विचार करा. त्यानंतर ती गोष्ट करण्यास सुरुवात करा, परंतु त्यात पहिल्यांदा काही वेळेस अपयश आले तर हार मानू नका. आपल्या ध्येयावर टिकून राहून कार्यरत राहिले तर आपल्याला यश निश्चितच मिळत असते, असे सीएच्या अंतिम परिक्षेत नाशिकमध्ये पहिल्या क्रमाकांने आणि भारतात 15 व्या क्रमांकाने पहिल्या टप्प्यातच पास झालेल्या साहिल दिलीप समनानी याने सांगितले.

साहिलने हे सांगताना आजच्या युवकांना मोबाईल फोनपासून दूर राहून करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन केले आहे.
नाशिक शहरातील सेंट झेवियर स्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर साहिलने फ्रावशी अॅकेडमीमध्ये 11 वी व 12 वीचे शिक्षण घेतले. त्यानंतर बी.कॉमच्या पहिल्या वर्षांला प्रवेश घेवून लगेचच सीएच्या अभ्यासाला सुरुवात केली. सीएचा अभ्यास करायचा असल्याने बी.कॉम.चे शिक्षण हे बाहेरून केले. सुरुवातीला खरे तर बीबीए करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु एका शिक्षकाच्या मार्गदर्शनामुळे सीएचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. सीएची अंतिम परिक्षा देण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांला कोणत्या तरी सीएकडे एन्ट्रनशीप करावे लागते. मात्र यात खूप वेळ जात असतो, त्यामुळे अभ्यास करण्यास फारच कमी वेळ मिळत असल्याचे त्याने सांगितले. तरीसुद्धा दिवसभर ऑफिसमध्ये काम करून पहाटे साडेतीन वाजता उठून अभ्यास सुरुच ठेवल्याने हे यश बघावयास मिळाले आहे.

साहिलची आई गृहिणी आहे. तर वडील हे व्यापारी आहेत. आई आणि वडिलांनी कोणतेही शिक्षण घे पण ते पूर्ण कर असे सांगितले होते. त्यामुळे सीएला प्रवेश घेताना सुद्धा आई-वडीलांना एक नाही दोन नाही तर तीन प्रयत्न करावे लागले तरी आता मागे हटायचं नाही, असे सांगितले होते. त्यामुळे सातत्य ठेवून पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळाले असल्याचे साहिल सांगतो.
हा अभ्यास करताना अनेक अडचणी आल्या आहेत. नाशिक शहरात असे अनेक विद्यार्थी आहेत जे सीएचा अभ्यास मुंबई व पुणे येथील क्लासमधून पेनड्राईव्हच्या माध्यमातून नोटस् घेवून करतात. आता ऑक्टोबरपर्यंत सध्या सुरु असलेली एन्ट्रनशीप पूर्ण करणार आहे. त्यानंतर फायनान्स क्षेत्रात नोकरी करण्याचा विचार असल्याचे त्याने सांगितले.
विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर त्यांना पहिल्यांदा मोबाईलपासून दूर राहिले पाहिजे. फोन्सचा वापरच बंद केला पाहिजे. त्याचबरोबर अभ्यासाची वेळ जास्तीत जास्त वाढविली पाहिजे. पहाटे लवकर उठून अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत साहिलने व्यक्त केले.