नाशिक (राजन जोशी) :- शांत, मितभाषी, अभ्यासू असे व्यक्तीमत्व असलेल्या नाशिकच्या यश सुमेरकुमार काले याने युपीएससी परीक्षेत भरघोस यश संपादन केले. भारतात 22 वा तर महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान त्याने मिळवला आहे.

शालेय शिक्षण घेतल्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण पुर्ण झाल्यावर केवळ आवड आणि वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशासाठी काही तरी करावे या उद्देशाने युपीएससी परिक्षेचा अभ्यास सुरु करून त्यात यश सुमेरकुमार काले याने यश संपादन केले आहे. आता येत्या काळात फॉरेस्ट सर्व्हिसेसचे प्रशिक्षण घेण्याबरोबरच आयएएस अधिकारी होण्यासाठीही तयारी सुरु केली असल्याचे यश याने सांगितले.
नाशिक शहरात असलेल्या विक्रीकर विभागात उच्चपदस्थ असलेल्या आणि नंतर जीएसटीच्या कार्यप्रणालीत सिंहाचा वाटा असलेल्या सुमेरकुमार काले यांचा यश हा मुलगा आहे. वडील सरकारी नोकरीत असल्याने साहजिकच गावोगावी बदल्या होत असतांना मुलांना सुद्धा अनेक ठिकाणी शाळा बदल कराव्या लागल्या. यश याने इयत्ता सहावी-पासून ते दहावीपर्यंतचे शिक्षण नाशिकच्या फ्रावशी अकॅडमीमध्ये घेतले त्यानंतर अशोका युनिव्हर्सलमधून 11 वी व 12 वीचे सायन्स विभागातून शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर पुणे येथे जाऊन मेकॅनिकल शाखेतून बी.टेकचे शिक्षण पुर्ण केले. हे शिक्षण पुर्ण झाल्यावर यश याने साहजिकच कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरीसाठी प्रयत्न केले, आणि त्याला झेडएस असोसिएट या कंपनीत चांगली नोकरी मिळाली.

शालेय जीवनापासूनच सामाजिक कार्याची आवड असलेल्या यशने त्याचे कार्य सुरुच ठेवले. यात वेगवेगळ्या विषयातून जनतेशी संवाद साधणे, पुण्याचे तत्कालिन आयुक्त शेखर गायकवाड यांचेसह नाशिकच्या अर्पण ब्लड बँकेच्या माध्यमातून कोविड वॉरियर्स म्हणून तत्कालिन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मुलाखती सुद्धा यशने घेतल्या आहेत. विशेष म्हणजे महाविद्यालयीन जीवनात यशने या सामाजिक आवडीतून युनिर्व्हसिटी रिप्रेझेव्टीव्ह म्हणून सुद्धा अनेक वर्षे काम पाहिले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील अंतिम वर्षात सुद्धा त्याने ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्याचबरोबर महाविद्यालयात ‘वाटचाल’ नावाचे एक महाविद्यालयीन सिमीत असलेले मासिकही सुरु केले. त्यामुळे स्वतःतील गुणांबरोबरच सहकारी विद्यार्थ्यांचेही गुण प्रदर्शित करण्याची संधी त्याने उपलब्ध करून दिली. आई-वडिल यांच्या सामाजिक कार्याचा त्याच्यावर पगडा आहे. त्यामुळे तोही सामाजिक कामासाठी अग्रेसर असतो. वडिल सरकारी नोकरीत असल्याने जनसेवेचे बाळकडू त्याला लहानपणापासूनच मिळाले होते.
शिक्षण झाल्यानंतर नोकरी करत असतांना नोकरीतील अनेक अडचणींना तोंड देत असतांनाच त्याने पाहिले की, वडील सुद्धा जीएसटीच्या कामात व्यस्त आहेत. व्यापार्यांना चांगले मार्गदर्शन करणे, जीएसटीतील सुरुवातीच्या काळातील त्रुटी शोधून त्यावर उपाय काढणे असे एक नाही तर अनेक कामे वडील करत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यावेळी असे वाटले की, समाजासाठी, देशासाठी किंवा देशातील प्रत्येक घटकासाठी वडील लढा देत आहेत तर आपणही असेच काही तरी करावे या उद्देशाने त्याने युपीएससीचा अभ्यास सुरु केला.
साहजिकच घरातील वातावरण हे सामाजिक कार्याचे असल्याने त्याला यासाठी आई-वडीलांकडून पुरेसे पाठबळ मिळाले. आपण या देशात आहोत तर देशाने आपल्यासाठी केलेले आहे तर आपणही देशासाठी काही तरी व्यापक केलेच पाहिजे हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्याने आपल्या अभ्यासाला सुरुवात केली. नुकत्याच झालेल्या युपीएससी परिक्षेत तो भारतातून 108 विद्यार्थ्यांमधून 22 व्या क्रमांकाने तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
या पुढील काळात फॉरेस्ट विभागाचे काम करतांना आयएएसची तयारी करणार असल्याचेही त्याने सांगितले. या सर्व यशात आई सुवर्णा काले, वडील सुमेरकुमार काले, बहीण श्रद्धा पहाडे आणि मेहुणे हर्षित पहाडे यांचेही मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभ्याचे यशने सांगितले. त्याचबरोबर शालेय जीवनापासून महाविद्यालयात किंवा सर्वत्र मिळालेले मार्गदर्शक, मित्र यांचाही या यशात सहभाग असल्याचे त्याने सांगितले. युपीएससी परीक्षेत यश मिळवणे इतके सोपे नसले तरी आपण जिद्द ठेवली तर नक्कीच आपण त्यात यशस्वी होतो तसेच कोणत्याही गोष्टीत यश मिळेपर्यंत हार मानली नाही पाहिजे, असे यशने सांगितले.
नाशिककरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करावा, भावी पिढीला त्यांचे मार्गदर्शन लाभावे
नाशिक शहरातील अनेक विद्यार्थी सध्या देशपातळीवर किंवा जागतिक पातळीवर आपले नाव कमावित आहेत. नाशिकमधून यशस्वी होणार्या या विद्यार्थ्यांचा सन्मान नाशिककरांनी करण्याबरोबरच नाशिकच्या पुढच्या पिढीला यांचे मार्गदर्शन कसे उपलब्ध होईल यासाठी आता पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. नाशिकमधील राजकीय नेते, महापालिका यासह अनेक सामाजिक संस्थांनी अशाप्रकारे उपक्रम सुरु केल्यास नाशिकच्या विकासाबरोबरच देशाच्या विकासालाही हातभार लागणार आहे.