प्रियकराने लग्नास नकार दिल्याने देवळाली कॅम्पला प्रेयसीची आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी) :- प्रियकराने लग्नास नकार दिल्याच्या नैराश्यातून मुलीने आत्महत्या केल्याची घटना देवळाली कॅम्प येथे घडली. या प्रकरणी प्रियकरास अटक करण्यात आली आहे.

याबाबत मयत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दि. 1 जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी यांच्या घराशेजारी असलेल्या बंद खोलीत आरोपी आदित्य उत्तम भालेराव (वय 21, रा. जुनी स्टेशनवाडी, देवळाली कॅम्प, जि. नाशिक) हा व फिर्यादीची मुलगी आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले. याबाबत मुलीस विचारपूस केली असता आरोपी आदित्य याने लग्नाचे वचन दिले असून, यापूर्वी पाच ते सहा वेळा आमचे शारीरिक संबंध झाले आहेत, असे सांगितले. त्यानंतर आरोपीला विचारपूस केली असता त्याने लग्नास नकार दिला. यातून नैराश्य आल्यामुळे पीडित मुलीने आत्महत्या केली.

या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार आरोपी आदित्य भालेराव याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील, तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!