प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुजॉय गुप्ता यांचा संघर्ष थक्क करणारा आहे. वडिलांचे छत्र वयाच्या 13 व्या वर्षी हरविले. आईसह कुटुंब रस्त्यावर आले. दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत, बालपणी भीक मागून पोट भरण्याची वेळ आली; मात्र प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सुजॉय गुप्ता यांनी डोळसपणे बिल्डर होण्याचे स्वप्न पाहिले. वेटरचे काम करून ते आज पंचतारांकित हॉटेलचे मालक झाले. बांधकाम व्यवसायात अभिनव प्रयोग करून व्यवसायाला आकार दिला. तीन वेळा फसविले जाऊनही बिल्डर होण्याचे स्वप्न भंगले नाही. एखाद्या चित्रपटाला शोभावी, अशा या कहाणीचे ते स्वत: नायक आहेत. काय आहे त्यांच्या यशाचे गुपित…? बेघर झालेला आणि बूट पॉलिश, वेटरचे काम करणारा तरुण अवघ्या काही वर्षांतच बांधकाम व्यवसायात कसा काय अनभिषिक्त सम्राट होतो, याची ही प्रेरणादायी, तसेच थक्क करणारी कहाणी…!

सुजॉय गुप्ता यांचे वडील फाळणीपूर्वीच्या बांग्लादेशमधील ढाक्याचे. फाळणीनंतर ते बांग्लादेश सोडून कोलकाता येथे आले. सुशिक्षित असल्याने त्यानंतर ते वृत्तपत्रातील जाहिरात वाचून नाशिकमध्ये करन्सी प्रेसमध्ये कामासाठी आले. त्यावेळी 70 ते 80 बंगाली निर्वासित नाशिकमध्ये येऊन स्थिरावले. त्या काळी नेसत्या वस्त्रानिशी हा चमू प्रेसमध्ये नोकरीसाठी आला आणि तेथे त्यांना राहण्यासाठी क्वार्टर मिळाले. कामगार म्हणून त्यांना नोकरीची संधी मिळाली. त्यानंतर सुजॉय यांचा जन्म झाला. सन 1978 मध्ये मधुमेहामुळे सुजॉय यांचे वडील आजारी पडले आणि 80 च्या दशकात ते मानसिक आजारी होऊन निधन पावले. त्यानंतर सुजॉय गुप्ता, त्यांची आई आणि बहीण यांच्या संघर्षाला प्रारंभ झाला. वडिलांच्या आजारामुळे त्यांनी मुलांची नावे शाळेतून नाव काढून घेतली. कुकरेजा कुटुंबांनी त्याकाळी सुजॉय यांच्या कुटुंबाला आधार दिला. सन 1984 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

वर्षभरात त्यांना सरकारी घर सोडावे लागले. काकांनी त्यांना घरी नेले; मात्र त्यांचा घरी नेण्याचा उद्देश अत्यंत सभ्य नव्हता. वडिलांच्या पैशावर काकांचा डोळा होता. त्यामुळे सुजॉय गुप्ता यांच्या आईने त्यांचा डाव हाणून पाडला. म्हणून काकांनी या सर्वांना घराबाहेर काढले. दोन मुलांना घेऊन ही माऊली थंडीच्या रात्री कुटुंबासह अक्षरश: रस्त्यावर आली.
त्याकाळी सुजॉय यांच्या आईने मुलांना मंदिराचा आधार शोधला आणि तेथे 10 ते 12 रात्री काढल्या. त्या रात्री या माऊलीने मुलांना मंदिरात चढविलेला प्रसाद खाऊ घातला. त्याकाळी सुजॉय यांना लहान असल्याने काहीच समज नव्हती; पण आपले वाईट दिवस आले हे त्यांना समजले. गुप्ता परिवारासह त्यांच्या समाजातील लोकांनी त्यांना टाळण्यास सुरुवात केली. या बेघर कुटुंबाला माजी महापौर अशोक दिवे यांनी आपल्या पंचशीलनगरातील एक झोपडीवजा घरात राहण्यास जागा दिली. तेथे स्वच्छतागृह नव्हते. शौचालयाकरिता बाहेर जावे लागे. अगदी छोट्याशा घरात हे कुटुंब आले. दरम्यान, कुकरेजा परिवारातील व्यक्तीमुळे दोन मुलांचे शिक्षण सेंट फिलोमिना शाळेत एकही रुपयासुद्धा फी न देता झाले आणि इतर खर्च कुकरेजा आणि दिवे परिवाराने उचलला. आई फॉल व पिकोचे काम करत असे आणि सुजॉय गुप्ताही यांनी प्रतिकूल परिस्थितीमुळे कामधंदा स्वीकारला.
सुजॉय हे शिक्षणासह वेटरचे काम करणे, बूट पॉलिश करणे, वडापाव विकणे, द्राक्षपेटी भरण्याचे काम दुपारी तीन ते रात्री 12 पर्यंत काम करीत असत. असा खडतर प्रवास सुरू असताना सुजॉय गुप्ता यांनी अमिताभ बच्चनचा ‘त्रिशूल’ सिनेमा पाहिला आणि श्रीमंत व्हायचे असेल, तर बिल्डर व्हायला पाहिजे, असा निर्धार पहिल्यांदा केला. त्याकाळी डी. जी. पाटील यांचा बंगला पाहून आपणही तसा बंगला बांधला पाहिजे, असे त्यांना वाटले. चित्रपटातील अतिशयोक्ती बघून त्यांना बिल्डर होणे फार सोपे असते असे वाटे; मात्र त्यासाठी मार्ग सापडत नव्हता. सिके्रट पुस्तकाचे वाचन केल्यानंतर सुजॉय गुप्ता यांच्या लक्षात आले, की एखाद्या विषयाचा ध्यास घेतला, तर ते स्वप्न पूर्ण होते, हा धडा त्यांनी घेतला.
दरम्यान, गुप्ता कुटुंब पुन्हा पंचशीलनगरहून गांधीनगरमध्ये राहायला आले. सुजॉय गुप्ता यांनी शिक्षण घेऊन कंपनीत कामे केली. बिल्डर होण्यापर्यंतचा प्रवास नक्कीच इतका सोपा नव्हता. 9 वर्षे गांधीनगरच्या 300 स्वेअरफुटांच्या खोलीत ते राहिले.
दरम्यान, त्यांनी वयाच्या 24 व्या वर्षापर्यंत अंबड, सातपूर औद्योगिक वसाहतीत रोजंदारीवर काम केले. हॉटेलमध्ये भांडी घासण्याचे काम केले. त्यांचे काम पाहून किचनबाहेर किचन ऑर्डर टेबलचे काम दिले. त्यानंतर वेटर, स्टुअर्ड व रिसेप्शनिस्ट असे काम करीत हॉटेलच्या असिस्टंट मॅनेजरपर्यंतची त्यांनी कामे केली.
तीन वेळा बिल्डर होण्याचे स्वप्न भंगले
बिल्डर होण्याचे स्वप्न मनात उभारी घेत तेव्हा सुजॉय गुप्ता यांनी तीन वेळा बिल्डर होण्यासाठी प्रयत्न केला. पहिल्यांदा त्यांच्या मित्राने त्यांना बिल्डरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 50 हजार रुपये मागितले आणि फर्म काढू, असे सांगितले. त्यावेळी त्यांनी आईला विश्वासात घेऊन वडिलांचे बँकेत ठेवलेले एफडीचे 50 हजार रुपये काढले. फर्म काढली; मात्र मित्र लबाड निघाला आणि पैसे घेऊन पळून गेला. स्वप्न भंगले व पैसेही गेले. मोठी पुंजी गमावली. हाणामारी करून पैसे आणण्याची त्यांची मन:स्थिती नव्हती. यामधल्या काळातही साईकृपा बिल्डर फर्ममध्येही त्यांनी पैसे गुंतविले; मात्र दुर्दैवाने तीही काही दिवसांतच बंद पडली. त्यातही पैशाचे नुकसान झाले होते.
मित्राने पैसे घेऊन फसविल्यानंतर सुजॉय गुप्ता यांनी गुजरातमधील आणंद येथे नोकरी केली. तेथून येऊन मग 1992-93 दरम्यान, गॅसबत्ती विकण्याचे काम घेतले. प्रत्येक बत्ती विक्रीमागे त्यांना 100 रुपये मिळत. त्यांनी सराफ बाजारासह मालेगाव, धुळे आदी शहरांत बत्त्या विकून सहा महिन्यात दीड ते दोन लाख रुपये कमावले. पुन्हा त्यांच्यातील बिल्डर होण्याची ऊर्मी जागली. यादरम्यान, पळसेला खंडू गायधनी यांची मुलाखत झाली. त्यांनी त्यांची जमीन बिल्डिंग बांधण्यासाठी देऊ केली. जागा त्यांची आणि सुजॉय गुप्ता बांधून देणार, असा करार झाला.
त्यावेळी अनुभवाची काहीच शिदोरी त्यांच्याजवळ नव्हती. तरीही त्यांनी बिल्डर होण्यासाठी जंग जंग पछाडले होते. वाजपेयी यांच्याकडून स्टॅम्प घेतले. कागदपत्रे तयार केली. नोटरीकडे जाऊन करार झाला. दि. 26 जानेवारी 1994 रोजी पुन्हा बिल्डर होण्याच्या स्वप्नाला खतपाणी घातले; मात्र हे स्वप्न मूर्तिमंत स्वरूपात अवतरणार होते. महंत गणेश बाबा व आपल्या आईच्या हस्ते भूमिपूजन झाले. रंगलहरीमध्ये स्वहस्ते रंगविलेले बोर्ड लावला व बिल्डर होण्यासाठी तिसर्यांदा यशस्वी प्रयत्न झाला. कोणालाही ईएमआय किंवा टप्प्याने पैसे देण्याची सवलत दिली, तर लोक कोणतीही वस्तू विकत घेऊ शकतात हे गुपित सुजॉय आपल्या व्यवसायातून शिकले होतेच, ते गुपित त्यांनी आपल्या फ्लॅट विक्री व्यवसायात उतरविले. कॉन्ट्रॅक्टर, इंजिनिअर, आरसीसी स्ट्रक्चरल इंजिनिअर असा सर्वांचा शोध घेऊन फ्लॅटची इमारत बांधण्याचे त्यांनी ठरवले. जाहिरात आणि प्रसिद्धी महत्त्वाची होती. त्यासाठी त्यांनी एक जाहिरात एजन्सी गाठून जाहिरात तयार केली आणि ती वृतपत्रात छापण्याचे ठरवले. 300 स्वेअर फुटांच्या फ्लॅटसाठी त्यांनी अवघे 75 हजार रुपये किंमत ठेवून हप्त्याने पैसे देण्याची योजना आखली.
विक्रीकौशल्याच्या जोरावर आणि वृत्तपत्रात जाहिरात देऊन त्यांना यशाचा मार्ग गवसला. 11 हजार रुपये बुकिंग रक्कम आणि 50 रुपये रोज किंवा एक हजार रुपये महिन्याच्या हप्त्यावर फ्लॅट घ्या, अशा योजनेची जाहिरात वृतपत्रात दिली. प्रकल्पाची प्रतिकृती तयार केली. भाड्याने दोन रूमचा फ्लॅट घेऊन हॉलला ऑफिस करून फर्म सुरू झाली. गरिबांना वा मध्यमवर्गीयांना परवडणारी 126 फ्लॅटचा तो प्रकल्प होता. जाहिरातीचा प्रभाव इतका झाला, की नागरिकांनी अक्षरश: रांगा लावून बुकिंग केली व 70 फ्लॅटची विक्री आठ दिवसांत झाली. खात्यात आठ दिवसांत साडेआठ ते नऊ लाख रुपये जमा झाले. तिसर्यांदा सुजॉय गुप्ता यांचे बिल्डर होण्याचे स्वप्न न भंगता मूर्तिमंत रूपात साकार होते होते.
पहिल्या प्रकल्पाला सुरुवात झाली. दरम्यान, सुजॉय गुप्ता यांच्या जीवनाला कलाटणी देणारी घटना घडली. मुंबईत कुख्यात गुंड पप्पू कलानीला अटक झाल्यानंतर त्याचे दोन भाऊ नाशिकमध्ये आले होते. त्यांनी सुजॉय गुप्ता यांच्यासोबत बिझनेसमध्ये भागीदारी करण्याचा प्रस्ताव दिला. पैसा आम्ही देतो, तू बिल्डर हो, असा प्रस्ताव त्यांनी दिला. तो गुप्ता यांनी स्वीकारला. बिल्डर होण्याच्या स्वप्नात दोन वेळा पार्टनरशिप घेऊन तोंडघशी पडल्यानंतरही सुजॉय गुप्ता यांनी तिसर्यांदा कलानी बंधूंसमवेत भागीदारी पत्करली. आता हा व्यवहारही त्यांना मोठा धडा शिकवून जाणारा होता. तीन वर्षे हा भागीदारी करार सुरू होता. अनेक प्रकल्प सुरू झाले. कलानींचा पैसा आणि गुप्ता यांनी विक्रीकौशल्य यातून अनेक प्रकल्पांचे बुकिंग झाले. यासाठी कलानी बंधू त्यांना दरमहा 5 हजार रुपये खर्चासाठी देत असत. त्यातून अनुभवाची शिदोरी प्रचंड मिळाली. सन 1998 मध्ये कलानींनी सुजॉय गुप्ता यांच्यासमवेतचा करार मोडला. करारात नमूद केले होते, की कलानी जितके पैसे देतील, त्या रकमेवर गुप्ता यांना दोन टक्के व्याज व त्यावर चक्रवाढव्याज द्यावे लागणार होते; मात्र ही बाब सुजॉय गुप्ता यांना नंतर कळाली होती. पुन्हा एकदा ते मोठ्या संकटात सापडले होते. या व्यवहारातही 25 लाखांची रक्कम आहे तशीच ठेवून पुन्हा कलानींना पैसे देणे गुप्ता यांना क्रमप्राप्त होते. पुन्हा एकदा मोठी शिकवण मिळाली होती. कलानी यांचे पैसे कार विकून, गॅसबत्ती विकून त्यांनी फेडले व पडझड झालेल्या मनाची आणि परिस्थितीची पुन्हा पुनर्बांधणी करण्याचे ठरवले.
कस्तुरा कंपनीची मुहूर्तमेढ रोवली
पार्टनरशिप बिझनेसमुळे पोळलेल्या सुजॉय गुप्ता यांनी यानंतर कधीही भागीदारी व्यवसाय न करण्याची शपथ घेऊन स्वतंत्र व्यवसाय थाटून बिल्डर होण्याचे ठरविले. आणि 15 ऑगस्टला 1998 मध्ये कस्तुरा कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. सैलानी बाबा भागाच्या पुढे गोपाल जाजू यांचा प्लॉट सुजॉय गुप्ता यांनी विकत घेऊन गृहप्रकल्प काढला. जाजू यांना धनादेश देऊन 29 गाळे व 29 फ्लॅटचा प्रकल्प आखला. मालकाला 28 गाळे आणि एक फ्लॅट आणि गुप्ता यांनी स्वत:कडे 28 फ्लॅट ठेवत प्रकल्प सुरू केला. 23 ऑगस्टला गुप्ता यांचे सर्वच सर्वच फ्लॅट बुक झाले. त्यातून साडेपाच लाख रुपये जमा झाले.
जंगी विवाह; नाकारलेल्या समाजाला निमंत्रण
कस्तुरा कंपनी उभारून फ्लॅट बुकिंगच्या पैशात जमा झालेले 5 लाख रुपये विवाहात खर्च करण्याचे आणि जंगी विवाह सोहळा करायचा असे ठरवून सुजॉय गुप्ता यांनी त्यांना प्रतिकूल काळात नाकारलेल्या सर्वांना आमंत्रण देऊन वसईला एसी बसने घेऊन जाऊन विवाहात राजेशाही बडदास्त ठेवली. संपूर्ण बंगाली समाजाला उंच हॉटेलमध्ये राहण्या-जेवण्याची सोय करून जंगी स्वागत समारंभ ठेवला आणि लग्न आणि स्वागत समारंभात त्यांनी अख्खे साडेपाच लाख रुपये खर्ची घातले होते. आता लोकांच्या बुकिंगचे पैसे संपले होेते. त्यासाठी नवीन प्रकल्पाची घोषणा करणे आवश्यक होते.
एव्हाना बिल्डर म्हणून त्यांची ख्याती आणि नावलौकिक तयार झाला होता. मेहनत आणि सचोटी, विश्वास यामुळे लोक त्यांच्या शब्दावर विश्वासही ठेवायला तयार होते. त्यामुळे त्यांनी नवीन प्रकल्पाची घोषणा करून त्यातून आलेल्या बुकिंगच्या पैशातून पहिला प्रकल्प पूर्ण केला. नंतर तिसरा प्रकल्प लाँच करून त्या पैशातून दुसरा प्रकल्प पूर्ण केला. अशी मजल दरमजल वाटचाल करीत करत चक्र यशस्वी होते गेले. पत्नी आणि छोट्या मुलाला घेऊन सुजॉय गुप्ता यांनी त्या काळी सकाळी 7 ते रात्री 12 असे अविरत परिश्रम करीत यशाचा मळा फुलविला. असे तावून सुलाखून सुजॉय गुप्ता यांनी बिल्डर होण्याची आपली चढती कमान सुरू ठेवली.
ड्रिम सिटी हा महत्त्वाकांक्षी ‘माईलस्टोन’ प्रकल्प
बांधकाम व्यवसायात यशस्वी टप्पे गाठत सुजॉय गुप्ता यांनी आपल्या कारकीर्दीतील सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली. 2005 मध्ये त्यांनी ड्रिम सिटी या प्रोजेक्टची घोषणा केली. पंचशीलनगरच्या शेजारी ड्रिम सिटी उभारण्याचे ठरविले. झोपडपट्टी, देशी मद्याची दुकाने, वाहतुकीसाठी पक्का रस्ता नाही. बकाल वस्ती असे सर्व असूनही त्यांनी तेथे ड्रिम सिटी प्रकल्पाची यशस्वी पायाभरणी केली. पंचशीलनगरमध्ये बालपण झालेल्या सुजॉय गुप्ता यांनी जागा घेऊन झोपड्या हलविल्या व ड्रिम प्रकल्प सुरू झाला. 310 फ्लॅटची योजना असलेल्या ड्रिम प्रोजेक्ट पथदर्शी प्रकल्प सुरू झाला. पहिला फ्लॅट 700 रुपयांनी, तर चार महिन्यांत तोच फ्लॅट 2100 रुपयात विकला. सर्वच्या सर्व फ्लॅट विकले गेले आणि त्यानंतर सुजॉय गुप्ता यांनी आजपर्यंत कधीच मागे वळून पाहिले नाही.
गरिबांची घरे ते नाशिकमधील 2 कोटींचा महागडा फ्लॅट
सुजॉय गुप्ता यांनी गरिबांसाठी जशी घरकुले तयार केली, तसाच नाशिकमधील सर्वांत महागडा फ्लॅट तयार करण्याचा विक्रमही आज त्यांच्याच नावावर आहे. अनेक माईल स्टोन प्रकल्पाचे ते सर्वार्थाने‘ पहिले’ शिलेदार ठरले आहेत. ड्रिम सिटी प्रकल्पात सर्वाधिक म्हणजे 310 फ्लॅट तयार करणारे ते पहिले बिल्डर ठरले. जेव्हा त्याकाळी बिल्डर 1 ते 7 बंगल्याचे प्रकल्प करीत त्यावेळी 56 बंगल्याचा व्हिला प्रकल्प असो, की 15 हजार स्वेअरफुटांचे बांधकाम असलेला फ्लॅटचा प्रकल्प ड्रिम फ्लॉवर, नेहमीच भव्यता आणि अभिनवता त्यांनी जपली. सम्राट वृंदावन प्रकल्पातून त्यांनी मथुरा नगरी उभारली. गोव्याचा समुद्र त्यांनी सम्राट ट्रॉपिकानामध्ये आणला. इंदिरानगरमध्ये सिंफनी प्रकल्प उभारला. हवेतील बंगला स्काय व्हिला निर्माण केला. घोषणा करताच अवघ्या काही तासांतच सर्वच सर्व स्काय व्हिला प्लॅट विकले गेले. नाशिकमध्ये सर्वप्रथम दोन कोटी रुपयांचा महागडा फ्लॅट (सिग्नेचर प्रकल्प) निर्माण करून विकण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे. नाशिकमध्ये जे काही अभिनव आणि लॅण्डमार्क प्रकल्प असतील, ते सम्राटचे असतील, असेही ते अभिमानाने सांगतात.
यशाची गुपिते काय?
सुजॉय गुप्ता यांनी बांधकाम व्यवसायात मोठे नाव, कीर्ती व यश मिळविले आहे. त्यामागे सचोटी, प्रामाणिकपणा आणि अविरत योग्य मेहनत तर आहेच; परंतु त्यांचा माणसे जोडण्याचा स्वभाव यामध्ये मोठा ठरतो.
आई आणि साईबाबांहची भक्ती करणार्या सुजॉय गुप्ता यांनी डोक्यात कधीही हवा जाऊ दिली नाही. पंचशीलनगरची झोपडपट्टी ते यशस्वी बिल्डर या प्रवासात त्यांनी कधीही व्यसने, मद्यपान केले नाही, की कधी कोणालाही फसवून पैसा लाटला नाही. दिवसा स्वप्न पाहा, स्वप्नामध्ये ताकद ठेवा. ते पूर्ण होईपर्यंत जिद्दीने, मेहनतीने पुढे जात राहा, असा सल्ला ते नव्या पिढीला देतात. तरुणाईने कोणतेही क्षेत्र निवडावे; परंतु त्यात सर्वोच्चपदी जाण्याचे ध्येय ठेवावे, सहा तास झोप घ्यावी. सामाजिक माध्यमांवर वेळ वाया घालवू नका. चांगले पुस्तके, माहिती पट, चॅनल बघावेत, असे ते तरुणांना सांगतात. लोक सल्ला देण्याचे काम करीत असतात. त्यांचे सल्ले शांतपणे ऐकून घ्या; मात्र तुम्ही तुमच्या मनाचे ऐका, असा मोलाचा सल्ला ते देतात.
आई-वडील आणि ईश्वराला कधीही अंतर देऊ नका, असे ते म्हणतात. उद्योगात जोडलेली कर्मचारी माणसे हे आपले धन आहे हे सांगायला ते कधीच विसरत नाही.
वेटर ते फाईव्ह स्टार हॉटेलचे मालक… संघर्षाचा प्रवास
सुजॉय गुप्ता यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे व वेटरचे काम केले आणि आज ते नाशिकमधील पंचतारांकित हॉटेल ‘मेरीएट’चे मालक आहेत. 110 मेरीएटपैकी एक त्यांच्या मालकीचा आहे. हा प्रवास जितका प्रेरणादायी तितकाच संघर्ष, वेदनांचा होता; मात्र स्वत:च्या मेहनतीवर विश्वास ठेवून त्याला सचोटी, मूल्य, तत्त्वांची जोड देऊन त्यांनी यशाची आकाशाला गवसणी घालणारी इमारत उभी केली आहे.
सामाजिक बांधिलकी अन् संवेदना
गरिबीतून वर आलेले सुजॉय गुप्ता यांनी उच्च सामाजिक मूल्ये नेहमीच जपली आहे. सम्राट गु्रपमध्ये संचालक म्हणून काम करताना सुजॉय आणि त्यांच्या पत्नीचा मिळणार्या पगाराचा एक रुपया ते घरी घेऊन जात नाहीत. हा पैसा ते आपल्याच स्वयंसेवी संस्थेला दान देतता. सिन्नर-घोटी मार्गावर गुप्ता यांनी 18 वर्षांवरील मानसिक विकलांग व्यक्तींसाठी आधार संस्था चालवता. तेथे 117 मानसिक रुग्णांना हक्काचे घर मिळाले आहे. तर 18 वर्षाखालील मुलांसाठी रुसी-राणी नावाची संस्था आहे. अंध आणि नेत्रहिनांसाठी काम करणारी संस्थाही सुजॉय गुप्ता चालवीत आहेत. 44 अंध जोडपी तेथे राहून स्वत:च्या पायावर उभी आहेत.