नवी दिल्ली : लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने आशिष मिश्राला अनेक सूचना तसेच अटी घातल्या आहेत. आठ आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर करताना कोर्टाने मिश्राला दिल्ली आणि यूपीमध्ये वास्तव्यास मनाई केली आहे. जामीन मिळाल्यानंतर मिश्राला आठवडाभरामध्ये उत्तर प्रदेश सोडावे लागणार आहे.
दरम्यान, मागील वर्षी लखीमपूर खेरी येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना थार गाडीखाली चिरडण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये काही शेतकऱ्यांचा मृत्यू देखील झाला होता. या प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. आरोपींना बेदम मारहाण करणाऱ्या चार शेतकऱ्यांना देखील न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

जामिनावर सुटल्यानंतर आशिष मिश्रा यांना आठवडाभरातच उत्तर प्रदेश सोडावे लागणार आहे. आशिष मिश्राला त्याचा राहण्याचा पत्ता पोलिसांना सांगावा लागणार आहे. तसेच दररोज त्याला पोलिस स्टेशनमध्ये रिपोर्ट करावा लागणार असल्याची अट सर्वोच्च न्यायालयाने घातली आहे. साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव ते टाकू शकत नाहीत, असे देखील न्यायालयाने सांगितले आहे. तसेच आशिष मिश्राला कोणत्याही साक्षीदाराला भेटता येणार नसल्यासही न्यायालयाने सांगितले आहे.
https://twitter.com/PTI_News/status/1618119464377286657?s=20&t=bvVbTVpiOFfk-K172GR3Mg