स्वामी नारायण मंदिराने नाशिकची शोभा आणखी वाढेल : मुख्यमंत्री शिंदे

नाशिक (राजन जोशी) :- तपोवनात साकारण्यात आलेले स्वामी नारायण मंदिर हे नाशिक शहराची शोभा वाढवणारे ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिराच्या प्रतिष्ठापनेनिमित्त बोलताना केले.

तपोवन परिसरात असलेल्या केवडीवनात श्री स्वामी नारायण यांचे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना झाली असून आजपासून हे मंदिर भाविकांसाठी खुले झाले आहे. यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, श्री स्वामी नारायण यांच्या आशीर्वादामुळेच मी मुख्यमंत्री झालो आहे. कारण या मंदिराचा 11 नोव्हेंबर 2017 मध्ये ज्यावेळी शिलान्यास झाला होता. त्यावेळी सुद्धा मी त्या कार्यक्रमास उपस्थित होतो. त्यावेळी मी फक्त आमदार होतो. परंतु आता या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी मी मुख्यमंत्री झालो आहे, ही सर्व स्वामी नारायणाचीच कृपा आहे. अत्यंत कलाकुसरीने तीन वर्षांत हे मंदिर पूर्ण करणे हे भगवंताच्या आशीर्वादानेच शक्य झाले.

स्वामी नारायण संप्रदाय देशात आणि विदेशात भक्‍तीभावाचे काम करतो. त्यांची भावना ही त्यागाची आहे. आदिवासी पाड्यांवर सुद्धा त्यांचे मोठे काम असून आरोग्य, शैक्षणिक तसेच व्यसनमुक्तीसाठी सुद्धा त्यांचे कायम काम सुरू असते. या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमास येण्याचे भाग्य लाभल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

त्याचबरोबर गेल्या दोन ते अडीच महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले असून हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. राज्यातील सर्वसामान्यांना सोबत घेऊन पुढे नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मागील दोन वर्षार्ंपासून निर्बंधयुक्त असलेले सण आणि उत्सव आता मात्र आमच्या सरकारने निर्बंधमुक्त केले आहेत. त्याचबरोबर आमच्या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद आहे.

राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान मोदी कायम सरकारच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्य परमपूज्य महंत स्वामी महाराज यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन होऊन महाआरती करण्यात आली. त्यानंतर वेदमंत्र आणि पुरोहितांच्या हस्ते संकल्प करून हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

यावेळी विवेक सागर महाराज यांनी सांगितले की, हे मंदिर भारतीय संस्कृती आणि संस्कारांचे जतन करणारे ठिकाण आहे. राष्ट्रीय एकात्मता ही खर्‍या अर्थाने मंदिरांच्या माध्यमातूनच टिकून राहत असते. तीन वर्षात नाशिकमध्ये हे मंदिर उभारण्यात आले असून या मंदिरात येऊन भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी खा. राहुल शेवाळे, खा. हेमंत गोडसे, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, आ. सीमा हिरे, आ. सुहास कांदे, आ. राहुल ढिकले, शिवसेना (शिंदे गट) महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्यासह जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील, पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्यासह सर्व अधिकारी आणि नाशिकमधील तसेच देश-विदेशातील भाविक उपस्थित होते.

देश विघातक संघटनांवर बंदी घालणे योग्यच

देश विघातक कृत्ये करणार्‍या संघटनांवर बंदी घालणे हे योग्यच आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. भारत हा सर्व धर्मियांचा देश आहे. देशविघातक शक्तींना खत-पाणी घालणार्‍या व त्यांना पोसणार्‍या संघटनांवर कठोर कारवाई केलीच पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच छगन भुजबळ यांनी शाळेतील सरस्वती प्रतिमेला केलेला विरोध हा खपवून घेणार नाही. सरस्वती पूजन हे चालूच राहील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

https://twitter.com/mieknathshinde/status/1574972311689920513?s=20&t=rCej–TDubSi4WgyH6ze6w

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!