मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय महिला क्रिकेट संघ आजपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच टी -20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. आशिया कप स्पर्धेत विजय मिळल्यानंतर या फॉरमॅटमध्ये पहिल्यांदा खेळणार आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा संघ हा कॉमनवेल्थ स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकल्यानंतर टी-20 फॉरमॅट खेळण्यासाठी पहिल्यादांच देशाबाहेर पडणार आहे.
या मालिकेची महत्त्वाची बाब म्हणजे सर्व सामने मुंबईत होणार आहेत. त्यामुळे आजपासून क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका 9 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये तर शेवटचे तीन सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवले जातील.

विनामुल्य पाहता येणार सामने
या मालिकेतील पाचही सामने चाहत्यांना स्टेडियमध्ये विनामुल्य पाहता येणार आहे. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली होती. महिला क्रिकेटला प्राधान्य आणि चाहत्यांचे मनोरंजन करण्याचा हेतू यातून साध्य होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना आपल्या आवडत्या खेळाडूंना अगदी जवळून पाहता येणार आहे.
पहिला सामना, 9 डिसेंबर डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी, दुसरा सामना, 11 डिसेंबर डी.वाय.पाटील स्पोर्ट्स अकादमी, तिसरा सामना, 14 डिसेंबर ब्रेबॉर्न स्टेडियम मुंबई, चौथा सामना, 17 डिसेंबर ब्रेबॉर्न स्टेडियम मुंबई, पाचवा सामना, 20 डिसेंबर ब्रेबॉर्न स्टेडियम मुंबई.
हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील.