नाशिक (प्रतिनिधी) :- नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तब्बल आठ गुन्हेगारांना एकाच वेळी हद्दपार करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय व परिमंडळ-1 चे उपायुक्त अमोल तांबे यांनी दिले आहेत.
प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन किंवा त्यापेक्षा जास्त शरीराविरुद्ध व मालाविरुद्ध गुन्हा दाखल असणारे सराईत गुंड तडीपार करण्यात आले आहेत.
त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 अन्वये रणजित ऊर्फ स्वप्निल मारुती कांबळे (वय 30, राजदूत हॉटेलमागील झोपडपट्टी), अरुण मारुती कांबळे (वय 30, रा. राजदूत हॉटेलमागील झोपडपट्टी), राकेश शिवाजी आहेर (वय 33, रा. बजरंगनगर, आनंदवल्ली) व अनिकेत विजय पगारे (वय 23, रा. शिवाजीनगर) यांना एक वर्षासाठी नाशिक शहर व जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे, तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये अजय विठ्ठल घोडके (वय 25, रा. पंचवटी), रवी विठ्ठल घोडके (वय 27, रा. शिवाजीनगर), गोरख नागू अहिरे (वय 19, रा. मखमलाबाद) व अक्षय बाळासाहेब काकड (वय 26, रा. मखमलाबाद रोड) यांनाही नाशिक शहर व ग्रामीण जिल्हा हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे.
तसेच यापुढे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 अन्वये आणि यापूर्वी गुन्हे सिद्ध झाले असतील, अशा गुन्हेगारांवर कलम 57 अन्वये तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे. स्वत:ची गँग तयार करून गुन्हे करणार्या गुन्हेगारांवरही तडीपारीची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.