कोरोनामुळे दोन वर्ष पंढरपूर वारीत खंड पडला होता. मात्र यंदाची वारी मोठ्या उत्साहात पंढरपुरातून निघत आहे. पुढील ३० दिवसात ७०० वारकऱ्यांसह ५५० किलोमीटरचे अंतर पायी चालत ही पालखी २७ जून रोजी पंढरपुरात पोहचणार आहे. अशातच येत्या आषाढी उत्सवासाठी सर्व भाविक तयारीला लागले आहेत. त्यापार्श्वभूमीवर शेगाव येथून संत गजानन महाराज यांची पालखीचे आज शेगावातून पंढरपूरसाठी प्रस्थान होत आहे.
यंदा संत गजानन महाराज पालखीची ही ५४ वी वारी आहे.अत्यंत शिस्तबद्ध रीतीने पांढरा वेश धारण केलेले वारकरी ‘गण गण गणात बोते’ चा गजर करत मार्गस्थ होत आहेत. पालखीला शेगावातून निरोप देण्यासाठी हजारो भाविकांनी आज शेगावात हजेरी लावली आहे.
दरम्यान महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या यंदाचा आषाढी पालखी सोहळा येत्या २९ जूनला साजरा होणार आहे. आषाढी यात्रेदरम्यान भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आता मोबाईल घेवून जाता येणार आहे. तथापी मोबाईल वापरास मात्र बंदी कायम ठेवली आहे.
आषाढी यात्रा नियोजनासंदर्भात मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आषाढी यात्रा काळात भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांना मोबाईल घेवून जाण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.