नांदगांव (प्रतिनिधी) :- सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी पैशाची लाच म्हणून मागणी करणाऱ्या नांदगाव येथील तलाठ्यांस आज लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकड्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली.

याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी नांदगाव येथील तलाठी युवराज रामदास मासुळे यांच्या कडे जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावावे म्हणून रितसर मागणी केली. मात्र तलाठी मासाळे यांनी सदर सातबारा उताऱ्यावर तक्रारदारांचे नाव लावण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची मागणी केली असता दोन हजार रूपये आगाऊ म्हणून देण्याचे ठरल्याने व तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

त्यानुसार आज (दि. १३) दुपारी तीन वाजता जुन्या तहसील कार्यालयातील तलाठी कार्यालयात नाशिक येथील पथकाने सापळा रचून तलाठी मासुळे यांना २ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय अधिकारी नरेंद्र पवार, पोलीस हवालदार प्रकाश डोंगरे, प्रणय इंगळे यांनी ही कारवाई केली.