भयंकर! माध्यान्ह भोजनातल्या गरम पेजेत पडून दोन बहिणींचा मृत्यू

झारखंड : खेड्यापाड्यातल्या लहान मुलांना पोषक आहार मिळावा म्हणून शासनाने माध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे. परंतु, झारखंडमध्ये हीच योजना दोन लहान मुलींच्या जीवावर बेतली आहे. झारखंडमधल्या पलामू जिल्ह्यामध्ये भाताच्या पेजेने भरलेल्या टबमध्ये पडून अंगणवाडी केंद्रातल्या दोन बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरहसी ब्लॉकच्या सेलारी पंचायतीअंतर्गत येणाऱ्या छेचनी मिडल स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. ब्युटी कुमारी आणि शिबू अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत.

अधिक माहितीनुसार, परमेश्वर साहू नावाच्या स्थानिक गावकऱ्याच्या या मुली होत्या. अंगणवाडी केंद्राजवळच्या सेल्लारी पंचायतीच्या छेचनी मिडल स्कूलमध्ये माध्यान्ह भोजन शिजल्यानंतर तांदळाची गरम पेज एका उघड्या टबमध्ये ठेवलेली होती. त्या ठिकाणच्या अंगणवाडी केंद्रामध्ये शिकणारी मुले खेळता खेळता या टबजवळ आली. त्या वेळी दोन बहिणी त्या गरम पेजमध्ये पडल्या.

या घटनेत भाजलेल्या मुलांना अगोदर मेदिनीनगरच्या मेदिनी राय मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयामध्ये उपचारासाठी  दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती फार गंभीर असल्याने त्यांना रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये हलवण्यात आले होते.

तरहसी ब्लॉकचे बाल विकास प्रकल्प अधिकारी सच्चिदानंद महतो यांनी सांगितले की, दोघींपैकी लहान बहीण ब्युटी कुमारीचा मंगळवारी (दि. 6) संध्याकाळी मृत्यू झाला. मोठी बहीण शिबू हिचा बुधवारी (दि. 7) रांची येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करताना अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही मुलींना वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले, परंतु त्यात यश आले नाही.

शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेनंतर ब्लॉक शिक्षण विस्तार अधिकारी परमेश्वर साहू यांनी शाळेच्या सचिव आणि मुख्याध्यापिका उमा देवी यांना मुख्याध्यापक पदावरून हटवले आहे. सोबतच त्यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे. माध्यान्ह भोजन समन्वयक शोभा देवी आणि स्वयंपाकी कालो देवी व सविता देवी यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!