ठाणे पोलिसांची वेबसाइट हॅक

ठाणे (भ्रमर वृत्तसेवा) :- ठाणे पोलिसांच्या वेबसाइटवर सायबर हल्ला झाला असून ही वेबसाइट अज्ञातांकडून हॅक करण्यात आली आहे. ही वेबसाइट हॅक केल्यानंतर त्यावरून हॅकर्सने केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

’भारत सरकार, तुम्ही वारंवार इस्लामबद्दल अडचणी करून वाद निर्माण करत आहात. तुम्हाला सहनशीलता कळत नाही. जगभरातील मुस्लिमांची लवकरात लवकर माफी मागा, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही,’ अशा आशयाचा मजकूर हॅकर्सने ठाणे पोलिसांच्या वेबसाइटवर प्रसारीत केला आहे.
मागील काही वर्षांपासून वेबसाइट हॅक करण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांपासून अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या आणि संस्थांच्या वेबसाइट हॅक करण्यात आल्या आहेत. अशातच आता ठाणे पोलिसांचीही वेबसाइट हॅक झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. वेबसाइट हॅक झाल्याच्या वृत्ताला वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनीही दुजोरा दिला आहे. दरम्यान, ही वेबसाइट कोणी हॅक केली, याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नसून सायबर पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक झाल्यानंतर काही काळाने ही वेबसाईट पुन्हा सुरू करण्यात ठाणे पोलिसांच्या सायबर सेलला यश आले असले, तरी सतर्कतेचा उपाय म्हणून काही वेळ वेबसाईटवर तांत्रिक दुरुस्ती केली जाणार असल्याचे पोलिसांकडून कळवण्यात आले आहे.
काल अशाच प्रकारे इस्त्रायलमधील भारतीय दूतावासाची वेबसाईट, राष्ट्रीय शेती व्यवस्थापन विभागाची वेबसाईट आणि कृषी संशोधन केंद्राची वेबसाईट देखील हॅक झाली होती. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार तब्बल 70 भारतीय वेबसाईट्सवर हे सायबर हल्ले करण्यात आले आहेत. वर्ल्ड वाइड वेबवरील डिजिटल यंत्रणेवर तसेच इंटरनेटसंदर्भातील हालचालींवर लक्ष ठेवणार्‍या वेबॅक मशीनने दि. 8 ते 12 जून दरम्यान भारतीय सरकारी साइट्स तसेच खासगी पोर्टल्स विस्कळीत झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

भारतामधील अनेक बँकांच्या वेबसाईट्स हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असा दावा सुरक्षा तज्ज्ञांनी केला आहे. 13 हजारांहून अधिक सदस्य असलेल्या याच हॅकटिव्हिस्ट ग्रुपची भारतातील अनेक प्रमुख बँकांच्या वेबसाईटवर हल्ले केल्याचा दावा केला जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!