नाशिक (प्रतिनिधी) : ग्राहकांशी संगनमत करून बँकेचे बनावट स्टेटमेंट बँकेस सादर करून कर्ज प्रकरण मंजूर करून घेत एका एजंटने सुमारे ५४ लाख रुपयांची फसवणूक करून पैशांचा अपहार केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी प्रमोदकुमार ओम्कारेश्वर अमेटा (रा. आशानगर, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली, मुंबई) हे आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या मायको सर्कलवरील शाखेचे व्यवस्थापक आहेत. त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की मुख्य आरोपी योगेश नाना पाटील (वय २७, रा. आबड रेसिडेन्सी, तळवाडे रोड, चांदवड, जि. नाशिक) हा आयडीएफसी फर्स्ट बँक मायको सर्कल शाखेतील अधिकृत एजंट आहे. त्याने दि. २ मार्च ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत कर्जदार ग्राहक व आरोपी गणेश फकिरा सांगळे, सूर्यकांत पंढरीनाथ वाघुळे, ताई पांडुरंग पगारे, योगेश सुकदेव काकड, सुरेखा सुकदेव काकड, नंदू देवराम काळे व स्वाती प्रवीण शिरसाठ (सर्वांचा पूर्ण पत्ता माहीत नाही) यांच्याशी संगनमत करून बँकेचे बनावट स्टेटमेंट तयार केले. त्यानंतर हे स्टेटमेंट आयडीएफसी फर्स्ट बँकेस सादर केले.

त्यानंतर कर्जदार ग्राहकांच्या नावाने ७ लाख ४ हजार २८२ रुपये गणेश सांगळे याच्या बँक खात्यावर दि. ८ सप्टेंबर रोजी, सूर्यकांत वाघुळे यांच्या बँक खात्यावर ८ लाख ७ हजार ४७८ रुपये, ताई पगारे यांच्या बँक खात्यात ७ लाख २७ हजार ३८६ रुपये दि. १९ ऑगस्ट रोजी, ६ लाख ९१ हजार ७७८ रुपये योगेश काकड यांच्या बँक खात्यात दि. १५ सप्टेंबर रोजी, ७ लाख ७५ हजार ४०७ रुपये सुरेखा गायकवाड यांच्या बँक खात्यात १८ एप्रिल २०२२ रोजी ९ लाख ९ हजार ३४१ रुपये नंदू काळे यांच्या बँक खात्यात, तर ७ लाख ९१ हजार १८१ रुपयांच्या कर्जाची रक्कम स्वाती शिरसाठ यांच्या बँक खात्यात दि. ३१ जुलै २०२२ रोजी जमा करण्यात आली.
या सातही ग्राहकांचे मिळून एकूण ५४ लाख ६ हजार ८६२ रुपयांचे कर्ज बनावट स्टेटमेंटच्या आधारे मंजूर करून घेत बँकेची फसवणूक करून त्या पैशांचा अपहार केला. ही बाब लक्षात आल्यानंतर बँकेचे व्यवस्थापक अमेटा यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात बँकेचा एजंट योगेश नाना पाटील याच्यासह इतर सात जणांविरुद्ध फसवणुकीची व अपहाराची फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.