नाशिक (प्रतिनिधी) :- चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत एका इसमाकडून 20 लाख रुपयांची रोकड व कार बळजबरीने लुटून नेणार्या अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नरेंद्र बाळू पवार (रा. अंतरिक्ष अपार्टमेंट, खुटवडनगर, अंबड, नाशिक) यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की फिर्यादी यांना दि. 29 जून रोजी सातपूर येथील सकाळ सर्कलजवळ अज्ञात आरोपीने भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर अज्ञात इसमाने पवार यांना जबरदस्तीने इर्टिगा कारमध्ये बसविले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. पैसे दिले नाहीत, तर तुझा गेम करू, अशी धमकी देत उड्डाणपुलावरून घोटीकडे घेऊन गेला.
यादरम्यान फिर्यादी पवार यांचे औरंगाबाद येथे राहणारे मित्र विजय खरात यांना फोन करून 20 लाख रुपये जमा करून पवार यांच्यासोबत गाडीत बसलेल्या इतर इसमांच्या सांगण्यावरून औरंगाबाद येथील सिडको बस स्टॅण्डजवळ आलेल्या इसमास देण्यास सांगितले.
त्यानुसार विजय खरात यांनी त्या व्यक्तीस 20 लाख रुपये रोख स्वरूपात दिल्यानंतर पुन्हा सकाळ सर्कलजवळ आणून फिर्यादी पवार यांना गाडीत बसवून आणखी पैशाच्या प्रलोभनाने त्यांच्या घरापर्यंत घेऊन गेला. त्यावेळी घराबाहेर उभी असलेली पवार यांची 10 लाख रुपये किमतीची एमएच 48 एटी 7689 या क्रमांकाची सिल्व्हर रंगाची ऑडिका कार, प्रत्येकी 20 व 10 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल व फिर्यादीच्या मित्राने रोख स्वरूपात दिलेले 20 लाख रुपये असा एकूण 30 लाख 30 हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात व्यक्तीने बळजबरीने लुटून नेला.
याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.