पुढच्या 48 तासांत राज्यात मान्सून दाखल होणार

मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):– राज्यात मान्सून लांबणीवर पडणार अशी चर्चा सुरु असताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने या सगळ्या चर्चाना पूर्णविराम दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून कोणताही विलंब न करता प्रगती करत आहे आणि येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात पोहोचेल, असे सांगण्यात आले आहे.

31 मे ते 7 जून दरम्यान मान्सूनने दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, संपूर्ण केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूचा काही भाग व्यापल्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आर. के. जेनामानी यांनी सांगितले. मान्सूनच्या वाटचालीस कोणताही विलंब झालेला नाही. येत्या दोन दिवसांत तो महाराष्ट्रात पोहोचेल आणि त्यानंतरच्या दोन दिवसांत मुंबई व्यापेल, हवामान विभागाचे अधिकारी जेनामनी म्हणाले.
आम्हाला खात्री आहे की पुढच्या 48 तासांत मान्सून राज्यात दाखल होणार आहे. दरम्यान त्यास पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. राज्यात मान्सून वारे वाहत आहे. तसेच ढग तयार होऊ लागल्याने मान्सूनला जास्त काळ लागणार नसल्याचे जेनामनी यांनी सांगितले.

मान्सून पूर्व पावसाने कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात 60 किमी वेगापर्यंतचे वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आल्याने 8 ते 10 जून या कालावधीत समुद्रात मासेमारीस जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या कुलाबा वेध शाळेकडून पर्जन्यमान विषयक प्राप्त झालेल्या माहितीनुसार 8 जूनते 10 जून या कालावधीत दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा व लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्राच्या ठिकाणी ताशी 40-50 किमी ते 60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे. मच्छीमारांनी संबंधित कालावधीत समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!