कराची (वृत्तसेवा):- पाकिस्तानमध्ये ऊर्जा वाचवण्याच्या उद्देशाने लग्नांवर निर्बंध आणण्याच्या निर्णय सरकारने घेतला आहे. इस्लामाबादमध्ये रात्री 10 वाजल्यानंतर लग्न सोहळ्यांवर बंदी घालण्यात आली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार बुधवारी सरकारने यासंदर्भातील निर्बंध जारी केले.

सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानमध्ये इंधनाच्या दरांबरोबरच वीजेचे दरही झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळेच वीजेचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने हे निर्बंध लादण्यात आले.
पाकिस्तानमधील आर्थिक संकटामुळे येथे ऊर्जासंकटही निर्माण झाले आहे. त्यामुळेच ऊर्जा वाचवण्याच्या उद्देशाने सरकारने काही निर्बंध लादले आहेत. वीजेचा वापर कमी व्हावा, या उद्देशाने मोठ्या समारंभांवर रात्री 10 नंतर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

बुधवारी म्हणजेच 7 जून 2022 रोजी हा निर्णय घेण्यात आल्यानंतर 8 जून पासून त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. इस्लामाबाद शहरासाठीच सध्या हा नियम लागू करण्यात आला असला तरी भविष्यातील ऊर्जेसंदर्भातील संकटाचे गांभीर्य पाहून याची व्याप्ती इतर शहरांमध्येही वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.