नाशिक (प्रतिनिधी) :- मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे शाळा ऑनलाईन पद्धतीनेच सुरु ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता उद्यापासून शहरातील सर्वच शाळा सुरु करण्यात येणार असून यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर यंदा शाळेत जाण्यास मिळणार असल्याने बालवाडी पासून सर्वच विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला असून शिक्षकांकडूनही विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे.
मागील दोन वर्षांपासून जुन महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शाळा पुर्णपणे बंद ठेवून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात आले होतेे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिमाण झाला असला तरी आता शाळा पुर्ण संख्येने खुल्या करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सध्या सुद्धा कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी शाळा सुरु करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
यंदाचे शैक्षणिक वर्ष हे 13 जून पासून सुरु करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना 15 जूनपासून शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी राज्य शासनाच्या नियमांना अनुसरून महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी काही मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोना लसीकरणासाठी वैध असलेल्या विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा पहिला डोस घेणे अपेक्षित आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचा पहिला डोस होवून 28 दिवस झाले आहेत त्यांना दुसरा डोस देण्यासाठी शालेय स्तरावरून महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सध्या कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असल्याने शिक्षकांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सुरु ठेवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लसीकरणावर भर देण्याची सुचना करण्यात आली आहे.
शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेणे, शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके प्राप्त होतील या दृष्टीने तयारी करावी, विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक माहिती द्यावी, शाळेचा परिसर स्वच्छ ठेवावा, स्वच्छतागृह व्यवस्थित आहेत की नाही याची खात्री करून घेवून ते स्वच्छ ठेवावे, धोकादायक इमारतीच्या भागात विद्यार्थ्यांना बसवू नये, शाळेच्या आवारातील मोठ्या वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करून घ्यावी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांची शाळेत येतांना कोरोनाच्या दृष्टीने तापमापक यंत्राच्या सहाय्याने तपासणी करावी, शाळेतील विद्यार्थी आजारी असल्यास त्यासंदर्भात पालकांशी चर्चा करावी, जास्तीत जास्त प्रमाणात काळजी घेवून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.