रुद्रा प्रॅक्टीकल स्कूलमध्ये 75 हजारांची चोरी

नाशिक (प्रतिनिधी) :- अंबड परिसरातील माणिकनगर येथे असलेल्या रुद्रा प्रॅक्टीकल स्कूलच्या गेटवरून प्रवेश करून 72 हजारांची रोकड व चेकबुक, डीव्हीआर व महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेणार्‍या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत स्मिता प्रवीण चौधरी (रा. त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक) यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की आरोपी सिद्धांत तेजाळे (वय 25, रा. भीमनगर, नाशिकरोड) हा दि. 12 मे रोजी अंबड लिंक रोडवरील माणिकनगर येथे रुद्रा प्रॅक्टीकल स्कूलच्या बिल्डिंगच्या गेटवरून आत आला.

त्याने दोन नंबरच्या गेटमधून बिल्डिंगमध्ये प्रवेश केला. तेथे असलेली 72 हजार 600 रुपयांची रोख रक्कम, तसेच दोन हजार रुपये किमतीचा सीसीटीव्हीचा डीव्हीआर यासह जळगाव पीपल्स व जळगाव जनता बँकेचे प्रत्येकी तीन चेकबुक, तसेच शाळेतील शिक्षकांच्या कागदपत्रांची फाईल असा एकूण 74 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादी चौधरी यांच्या संमतीशिवाय चोरून नेला.

या प्रकरणी सिद्धांत तेजाळेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस नाईक देशमुख करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!