मुंबई (भ्रमर वृत्तसेवा) :- सव्वा महिन्यापासून रखडलेला मुख्यमंत्री शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज झाला. त्यात चंद्रकांत पाटील यांना भाजप प्रदेशाध्यक्षपद काढून मंत्रिमंडळात गृहमंत्रीपद दिल्याचे वृत्त आहे. तसेच वादग्रस्त ठरलेले अब्दुल सत्तार यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातून दादा भुसे, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, डॉ. विजयकुमार गावित यांचा समावेश झाला आहे.
तब्बल 39 दिवसानंतर सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळाला आहे. एकूण 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात टीईटी घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले अब्दुल सत्तार आणि पुजा चव्हाण प्रकरणात वादग्रस्त ठरलेले संजय राठोड यांचाही समावेश आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वत:च्या गटाच्या 40 पैकी मंत्रिपद न मिळालेल्या सहकारी आमदारांची समजूत काढता काढता नाकीनऊ आल्याचे वृत्त आहे. त्यात मुख्यत: संजय शिरसाठ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांंनी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी काल सायंकाळी, रात्री व आज सकाळी देखील 9 वाजता बैठक घेऊन मंत्रिपदाची अंतिम यादी निश्चित केल्याचे वृत्त आहे. रात्री पर्यंत 8 भाजपा आणि 8 शिंदे शिवसेना संभाव्य मंत्र्यांची नावे फायनल झाली होती. पण रात्री उशिरा अब्दुल सत्तार आणि मंगलप्रभात लोढा यांची नावे वाढवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिंदे गटाचे मंत्री – दादा भुसे, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभुराजे देसाई, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, संजय राठोड.
भाजपचे मंत्री – चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, विजयकुमार गावित, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा यांनी शपथ घेतली.