मुंबई :- राज्यसभा निवडणुकीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

बऱ्याच राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. त्यामुळे भाजपाचे तीन सदस्य राज्यसभेवर निवडून गेले असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत. या विजयामुळे देवेंद्र फडणवीसांची चाणक्यनीती यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

काल सकाळपासून या मतदानाला सुरुवात झाली होती. शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार या दोघांचा विजय होईल असा दावा केला जात होता. मात्र, मध्यरात्री झालेल्या मतमोजणीमध्ये संजय पवार यांना फक्त ३९ मते मिळाली असून धनंजय महाडिकांना ४१ मते मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा धक्कादायक पराभव मानला जात आहे. “चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवशी त्यांना कोल्हापूरचा एक पैलवानच भेट दिला”, अशी प्रतिक्रिया धनंजय महाडिकांच्या विजयावर देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.