मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याने अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. काल ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तिला अटक केली आहे. यानंतर आज ठाणे कोर्टाने तिला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये केतकीने शरद पवारांवर अत्यंत वाईट भाषेत टीका केली होती. या प्रकरणी केतकी चितळेवर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कळवा पोलिसांनी कलम 500, 505 (2), 501 आणि 153 A हा गुन्हा दाखल केला आहे.
केतकीने वकील न घेता स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. सकाळी केतकीला सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. त्यानंतर ठाणे गुन्हे शाखेने 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली. गोरेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील केतकीचा ताबा घेण्यासाठी ठाणे कोर्टात हजर होते.
केतकीने कोर्टात सांगितलं की, ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? असा सवाल देखील तिने केला. तिने सांगितले की मी या पोस्ट मी डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे.
केतकीवर आतापर्यंत राज्यभरातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतकी चितळेच्या पोस्टमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. काल नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना केतकीच्या अंगावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंडी आणि शाईफेक केली होती. आजही राज्याच्या विविध भागात राष्ट्रवादीकडून केतकीविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.