गुवाहाटी :- येथील रॅडिसन ब्ल्यू लक्झरी हॉटेलमध्ये शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ४० आमदारांसोबत गेल्या ६ दिवसांपासून वास्तव्यास आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार या हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांसाठी ७० खोल्यांचे बुकिंग करण्यात आले असून त्यासाठी ५६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. ज्यामध्ये कार्यक्रमासाठी जागा, एक आऊटडोअर पूल, एक स्पा आणि पाच रेस्टॉरंट आहेत. या बंडखोर आमदारांचा दैनंदिन अंदाजे खर्च ८ लाख रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या आमदारांचा सर्व खर्च भाजपा करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. मात्र, आसामचे मुख्यमंत्री भाजपा नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
भाजपा किंवा आसाम सरकार या बंडखोर आमदारांच्या हॉटेलचे बील देत नसल्याचा दावा सरमा यांनी केला आहे. जर कोणी पाहुणे आसामला आले तर त्यांची गैरसोय होणार नाही किंवा ते सुरक्षित रहावेत यासाठी माझे प्रयत्न असतात. उद्या काँग्रेस किंवा इतर पक्ष आसाममध्ये आले, तर मी अशाच पद्धतीने त्यांचे स्वागत करेल असे सरमा म्हणाले. भाजपा किंवा आसाम सरकार हॉटेलचे बील का देईल? उलट आसामला हॉटेलकडून जीएसटीतून उत्पन्न मिळते. यासाठी मी शिवसेनेचे आभार मानतो.