Home महाराष्ट्र कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेत नाशिक परिमंडलात “इतक्या” शेतकऱ्यांनी घेतला लाभ

कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेत नाशिक परिमंडलात “इतक्या” शेतकऱ्यांनी घेतला लाभ

0

नाशिक :- कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्यासाठी थकबाकीच्या रकमेत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी राज्य शासनाच्या महाकृषी ऊर्जा अभियानाच्या माध्यमातून उपलब्ध आहे.

नाशिक परिमंडलातील २ लाख ७६ हजार ६३४ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. या ऐतिहासिक योजनेत सहभागी होऊन कृषिपंपाचे वीजबिल कोरे करावे तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

या योजनेत वीजबिलांच्या वसुलीतून एकूण ६६ टक्के कृषी आकस्मिक निधी म्हणजेच प्रत्येकी ३३ टक्के निधी
ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर विकास कामांसाठी खर्च करण्यात येत आहे. हा निधी संबधीत  ग्रामपंचायत व जिल्ह्याच्या क्षेत्रातच स्थानिक वीजयंत्रणेच्या पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येत आहे. स्वतंत्र खात्यात जमा होणाऱ्या निधीतून नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्र व क्षमतावाढ तसेच नवीन वीजजोडण्या यासह वीज वितरण व उपकेंद्रातील विविध यंत्रणेच्या पायाभूत सक्षमीकरण करण्यात येणार  आहे. त्यामुळे कृषिपंपांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. कृषिपंपांच्या वीजबिलांतून संपूर्ण थकबाकीमुक्ती व सोबतच भरलेल्या वीजबिलांच्या ६६ टक्के निधीतून गावातील वीजयंत्रणेचा विकास या दुहेरी फायद्यासाठी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महाकृषी ऊर्जा अभियानात शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी सुमारे ६६ टक्के सूट मिळणार आहे. मूळ थकबाकीमधील व्याज व दंड माफी तसेच निर्लेखन यानंतरच्या सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम येत्या मार्च २०२२ पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकीदेखील माफ करण्यात येत आहे. आतापर्यंत नाशिक परिमंडलातील २ लाख ७६ हजार ६३४ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये त्यांनी थकबाकी व चालू वीजबिलांपोटी २६८ कोटी ६७ लाख रुपयांचा भरणा केला आहे. यात नाशिक जिल्ह्यातील १ लाख २६ हजार ४३६ ग्राहकांनी १६३ कोटी १७ लाख तर अहमदनगर जिल्ह्यातील १ लाख ५० हजार १९८ ग्राहकांनी १०५ कोटी ५० लाख रुपये वीजबिल भरले आहे. या शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट मिळाली आहे. नाशिक परिमंडलात ४२ हजार ३०६ शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. यात नाशिक जिल्ह्यात ३३ हजार ३९२ तर अहमदनगर जिल्ह्यातील ८ हजार ९१४ ग्राहकांचा समावेश आहे. त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रकमेचा भरणा केला आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्येही त्यांना सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.


नाशिक परिमंडलातील ७ लाख ४४ हजार ७१० शेतकऱ्यांकडे एकूण ८०६४ कोटी २२ लाख रुपयांची एकूण थकबाकी होती. त्यातील व्याज व दंड माफीसोबतच महावितरणच्या निर्लेखन सूटद्वारे आता ५६५२ कोटी ५९ लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यातील ५० टक्के रक्कम येत्या मार्च २०२२ पर्यंत भरल्यास आणखी २८२६ कोटी २९ लाख रुपयांच्या उर्वरित सुधारित थकबाकीची रक्कम माफ होणार आहे. या ऐतिहासिक थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हावे तसेच चालू वीजबिलाचा भरणा करून वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळावी. वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसह आपल्या गावांतील वीज यंत्रणेचा विकास साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.