नाशिक (प्रतिनिधी) :- शहर परिसरात काल वेगवेगळ्या ठिकाणी तीन महिलांचा विनयभंग करण्यात आल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे.

विनयभंगाच्या पहिल्या प्रकारात नर्सरीचा रस्ता बंद का केला, असे विचारल्याचा राग आल्याने आरोपीने कुरापत काढून फिर्यादी महिलेच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली, तसेच फिर्यादीस अश्लील बोलून तिच्या अंगावरील गाऊन ओढून विनयभंग केल्याप्रकरणी एका इसमाविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.
विनयभंगाचा दुसरा प्रकार म्हसरूळ परिसरात घडला. याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की आरोपी पुरुषाने फिर्यादीच्या पतीच्या व्हॉट्सअॅप मोबाईल ग्रुपवर मेसेज पाठवून त्यात म्हटले, की फिर्यादी महिला व आरोपी यांच्यात अठरा वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. पीडितेने आयुष्य बरबाद केले, तसेच ती चारित्र्यहीन आहे, तसेच अश्लील व्हिडिओ प्रसारित करून पीडित महिलेची बदनामी केली, तसेच मुलाचा होणारा साखरपुडा मोडावा या उद्देशाने आरोपीने ही कृती केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात एका जणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक साखरे करीत आहेत.
विनयभंगाचा तिसरा प्रकार नाशिकरोड परिसरात घडला.
याबाबत महिलेने उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला तिच्या नातेवाईक व मतिमंद मावशीसह एकत्र राहते. काल सायंकाळी 5 वाजता फिर्यादी महिला ही काही कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यावेळी तिची मतिमंद मावशी एकटीच फ्लॅटमध्ये होती. फिर्यादी महिला ही सायंकाळी 7 वाजता काम आटोपून घरी परतली. तिने फ्लॅटची बेल वाजविली असता मावशीने उशिरा दरवाजा उघडला. त्यावेळी आरोपी इसम हा फ्लॅटच्या गॅलरीमध्ये लपलेला दिसून आला. त्याने घरात कोणी नसल्याची संधी साधून प्रवेश करून मतिमंद मावशीचा विनयभंग केला. म्हणून त्याच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोळे करीत आहेत.