नाशिक (प्रतिनिधी) :– फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून त्याचे बनावट साठेखत तयार करून तो परस्पर दुसर्याला विकून बिल्डरने महिलेची तीन लाख रुपयांना फसवणूक केल्याची घटना नाशिकरोड येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी कविता किरण धोंगडे (वय 44, रा. माधव शिल्प अपार्टमेंट, दत्तमंदिररोड, नाशिकरोड) असे फसवणूक झालेल्या माहिलेचे नाव आहे. आरोपी महेश गंगवाणी (रा. श्रीकृपा लॉजिंग, साईकिरण फर्निचर, दत्तमंदिररोड, नाशिकरोड) व इतर चार जणांचा सर्वे नं. 10/6/1+2 प्लॉट नं. 4, 350.00 चौ.मी. या क्रमांकाचा भूखंड धोंगडेनगर येथे मे हेमगिरी बिल्डर्स यांचा असून, या ठिकाणी आरोपी गंगवाणी व त्यांचे इतर चार साथीदार हिमगिरी हाईट्स या नावाची चार मजली बिल्डींग तयार करणार असल्याचे फिर्यादी कविता धोंगडे यांना सांगितले. तसेच फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला.

दि.1 एप्रिल 2011 ते 1 जून 2011 या दरम्यान पाचही आरोपींनी महिलेशी वारंवार संपर्क साधून त्यांना नियोजित बिल्डींगमध्ये दुसर्या मजल्यावरील फ्लॅट नं. 202 हा 986 चौरस फुटाचा फ्लॅट देण्याचे आमिष दाखवले. यावर विश्वास ठेवून या महिलेने त्यांना फ्लॅट घेण्यासाठी होकार दिला. त्यानुसार आरोपींनी बनावट साठेखत करून तीन लाख रुपये घेतले. मात्र या आरोपींनी हा फ्लॅट कविता धोंगडे यांना न देता तो फ्लॅट विकून महिलेची फसवणूक केली. ही बाब लक्षात आल्यानंतर फसवणूक झालेल्या महिलेने न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार दिवाणी न्यायालय नाशिकरोड यांच्याकडे कलम 156 (3) प्रमाणे आदेश झाल्यामुळे नाशिकरोड पोलीस ठाण्यात आरोपी महेश गंगवाणी व इतर चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डगळे करीत आहेत.