टिपू सुलतान तलवारीचा लंडनमध्ये 143 कोटींना लिलाव, ठरलेल्या किमतीपेक्षा सातपट रक्कम

मुंबई: 18व्या शतकात बनवलेली टिपू सुलतानची तलवार लंडनमध्ये 143 कोटी रुपयांना विकली गेली आहे. म्हैसुरचा वाघ अशी ख्याती असलेल्या टिपू सुलतानच्या तलवारीचा लंडनमध्ये लिलाव झाला असून त्याला आतापर्यंतची विक्रमी म्हणजे 143 कोटींची किंमत मिळाली आहे. लिलावातून मिळालेली रक्कम ही अपेक्षेपेक्षा सात पट अधिक असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. ही तलवार आतापर्यंत विकली जाणारी सर्वात महागडी भारतीय आणि इस्लामिक वस्तू बनली आहे.

श्रीरंगपट्टनच्या लढाईत, 1799 साली ब्रिटिशांनी टिपू सुलतानचा पराभव केला आणि त्यावेळी त्याच्याकडील ही तलवार आपल्या ताब्यात घेतली. टिपू सुलतानच्या महत्त्वाच्या शस्त्रांमध्ये या तलवारीचा समावेश होता. त्याच्या हँडलवर सोन्यामध्ये ‘Ruler’s Sword’ असे लिहिले आहे.

टिपू सुलतानची ही तलवार जर्मन ब्लेडचा वापर करुन तयार करण्यात आली होती. या तलवारीच्या मुठेवर सोन्याने शब्द कोरलेले आहेत. यामध्ये देवाचे पाच गुण सांगितले आहेत.

4 मे 1799 रोजी टिपू सुलतानच्या पराभवानंतर, श्रीरंगपट्टन येथून त्याची बरीच शस्त्रे लुटली गेली. जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने टिपू सुलतानच्या सैन्याचा पराभव केला तेव्हा त्यांनी ही तलवार त्याच्या श्रीरंगपटन येथील राजवाड्यातून लुटली. युद्धात टिपू मारला गेला.

ब्रिटीश आर्मीचे मेजर जनरल डेव्हिड बेयर्ड यांना ही तलवार बक्षीस म्हणून भेट देण्यात आली होती. तलवार म्हणजे ब्रिटीश सैनिकांच्या शौर्याबद्दल आणि युद्धातील त्यांच्या वर्तनाबद्दल आदराचे प्रतीक समजली जायची.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!