नाशिक (प्रतिनिधी) – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षण जाहीर झाले असले तरी आज न्यायालयाने दिलेला निर्णय हा धक्कादायकच असल्याचे मत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.

राज्यातील ओबीसी आरक्षणासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर बोलताना भुजबळ यांनी सांगितले की, न्यायालयाने यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांना ओबीसी आरक्षण जाहीर केले आहे. परंतु त्यावेळी ज्या नगरपालिका व नगरपंचायतींचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही. त्या ठिकाणच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाने घ्यायच्या असे सांगितले होते.

त्यामुळे राज्यातील 92 नगरपालिका आणि चार नगरपंचायत यांना ओबीसी आरक्षण लागू झाले होते. परंतु आज निर्णय देताना राज्यातील 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणा विना घ्यायच्या असा निर्णय दिला आहे. त्यामुळे हा ओबीसी समाजावर अन्याय झाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यासंदर्भात केंद्र शासन राज्य शासन यांनी न्यायालयात पुन्हा अपील केले पाहिजे. तसेच अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने सुद्धा अपील करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.