मुंबई : आयपीएलच्या पुढील पाच हंगामांसाठीचे प्रसारण हक्क प्राप्त करण्यासाठी चार विभागांमध्ये मिळून 46 हजार कोटींची बोली लागली आहे. अ-विभागात समाविष्ट असणारे भारतीय उपखंडातील प्रसारण हक्क डिझ्नी-स्टारने मिळवले असून ब-विभागात डिजिटल माध्यमांचे हक्क व्हायकॉम 18ने प्राप्त केले आहेत.

अ आणि ब विभागातील प्रसारण हक्कांची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी क आणि ड विभागातील प्रसारण हक्कांसाठी विविध समूहांमध्ये चढाओढ सुरू आहे. त्यामुळे मुंबईत सुरू असलेला हा ई-लिलाव एका दिवसाने लांबला आहे. भारतीय उपखंडातील प्रसारण हक्क मिळवण्यासाठी डिझ्नी-स्टार आणि सोनी यांच्यात चुरस होती. अखेरीस डिझ्नी-स्टारने 23,575 कोटी रुपयांची बोली लावली. त्यांनी एका सामन्यामागे 57.5 कोटी मोजण्याची तयारी दर्शवली.

ब-विभागात समाविष्ट असलेले भारतीय उपखंडासाठी डिजिटल माध्यमांचे हक्क प्राप्त करण्याकरिता 20,500 कोटी रुपयांची विजयी बोली लावण्यात आली. हे हक्क रिलायन्सच्या मालकीच्या व्हायकॉम 18ने मिळवले आहेत. त्यामुळे टीव्ही आणि डिजिटल माध्यमांचे प्रसारण हक्क प्राप्त करण्यासाठी एकत्रित 44,075 कोटींची बोली लागली. क आणि ड विभागाचा लिलाव दुसर्या दिवशी पूर्ण होऊ शकला नाही.
काल लिलाव प्रक्रिया थांबवण्यात आली त्यावेळी क-विभागात दोन हजार कोटींची अखेरची बोली लागली होती. क-विभागात डिजिटल माध्यमांमध्ये प्रत्येक हंगामात निवडक 18 सामन्यांच्या (सलामीचा सामना, अंतिम सामना, बाद फेरीचे सामने समाविष्ट) प्रसारण हक्कांचा समावेश आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ड-विभागाच्या लिलावाला प्रारंभ होईल. या विभागामध्ये परदेशातील टीव्ही आणि डिजिटल हक्क समाविष्ट आहेत. 2017 मध्ये झालेल्या गेल्या प्रसारण हक्क लिलाव प्रक्रियेत स्टार इंडियाने 16,347 कोटी रुपयांसह पाच हंगामांसाठीचे (2018-22) प्रसारण हक्क मिळवले होते. यंदा या रकमेत जवळपास तिपटीने वाढ झाली आहे. प्रसारण हक्कांच्या माध्यमातून 47 ते 50 हजार कोटींची रक्कम अपेक्षित होती.